शिरगाव : ग्रामपंचायती या गावच्या विकासाचा आरसा असतो. गावची ग्रामपंचायत पाहिल्यानंतर गावच्या विकासाची दिशा समजते. हडपीड ग्रामपंचायतीला नवीन वास्तू बांधून मिळाली आहे. त्याप्रमाणे या गावची विकासाची दिशाही चांगलीच असेल. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सहकार्यातूनच ही वास्तू उभी राहिली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी हडपीड येथे व्यक्त केले.जिल्हा वार्षिकच्या जनसुविधा योजनेंतर्गत ११ लाख ८५ हजार रूपये खर्चून देवगड तालुक्यातील हडपीड येथे बांधण्यात आलेल्या नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन प्रजासत्ताकदिनी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंत म्हणाले, कणकवली- देवगड- वैभववाडी या मतदारसंघाचा विकास हा आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून व नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यापुढे या मतदारसंघाचा विकास आणखीन जोमाने होईल. शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासकामे येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे प्राधान्याने मार्गी लावली जातील. विकासासाठी आमदार नीतेश राणे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून विकासाला साथ द्या, असे मार्गदर्शन केले.नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ््याच्या निमित्ताने हडपीड ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत सरपंचपद भुषविलेल्या सर्व माजी सरपंचांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी साटम, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, विभावरी खोत, सरपंच शैलजा गुरव, पंचायत समिती सदस्य रवींद्र जोगल, जिल्हा बँकेच्या संचालिका सुगंधा साटम, शिरगाव सरपंच अमित साटम, कोळोशी सरपंच सुशील इंदप, कणकवली युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसरपंच वासंती बागवे, ग्रामसेवक व्ही. एस. मलगुंडे, दाजी राणे, किशोर राणे, आर. जी. सावंत, कांता माळवदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक परमानंद सावंत, सूत्रसंचालन अश्विनी गर्जे यांनी केले. आभार किशोर राणे यांनी मानले. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायती गावाच्या विकासाचा आरसा
By admin | Updated: January 29, 2015 00:10 IST