रहिम दलाल -रत्नागिरी -ग्रामपंचायतींकडून ई - टेंडरिंगची कामे वेळेवर होत नसल्याने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील ४४ वाड्यांची कामे रखडली आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़ केंद्र शासनाने भारत निर्माण कार्यक्रमाचे नामकरण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम असे केले़ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या आणि तांडे यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या़या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३९९ वाड्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता़ त्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ३२६ वाड्या आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये ७३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे़ यामधील सुमारे १०० कामे पूर्ण झाली असून, २५३ कामे सुरु आहेत़ अजूनही ४४ ग्रामपंचायतींकडून कामांचे ई-टेंडरिंग करण्यात आलेले नाहीत़ या कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया करावी लागते़ त्यासाठी ही निविदा ई-टेंडरिंगने काढणे आवश्यक आहे़ मात्र, अनेक ग्रामपंचायतींकडून ई-टेंडरिंगचे काम वेळेवर होत नसल्याने निविदा प्रक्रियेला वेळ लागत असल्याने ही कामे अडकली आहेत़ त्यामुळे या कार्यक्रमाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़जिल्ह्यातील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे रखडल्याने ई-टेंडरिंग करण्याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतींना वेळोवेळी कळविण्यात आले आहे़ मात्र, ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करीत आहे़ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे इ टेडरिंगपध्दतीचा वापर होणार आहे.