शिवाजी गोरे / दापोलीकोकणाचे अर्थकारण योग्य दिशेला नेणारे आंबा पीक यावेळी अवकाळी पावसामुळे धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आंबा बागायतदारांनी कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार फवारणी करून आपले नुकसान टाळणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी दिला आहे. आंबा बागायतदारांसाठी आॅक्टोबर-नोव्हेंबर हा कालावधी महत्त्वाचा असतो. या कालावधीत आंब्याला पालवी फुटते. याच कालावधीत आंब्यावर चिकटा, करपा, बुरशीसारखे रोग पडतात. नोव्हेंबर महिना मोहोर येण्याचा कालावधी असतो. नोव्हेंबर - डिसेंबर या महिन्यात आंब्याला मोहोर येतो. याच कालावधीत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंब्यावर विविध रोग होतात. ढगाळ व दमट वातावरण अळीला अंडी उबवण्यासाठी पोषक असते. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर करपा, चिकटा पडतो. त्याचवेळी आंब्यावर फवारणी केल्यास होणारा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी कीटकनाशक फवारुन त्यावरील रोग नष्ट करणे गरजेचे आहे. कोकणात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने याचा आंबा पिकावर नक्की परिणाम होऊ शकतो; परंतु योग्यवेळी कीटकनाशके फवारल्यास होणारा धोका टळू शकतो, असाही सल्ला डॉ. भावे यांनी दिला आहे.आंबा बागायतदारांनी औषध फवारणीला प्राधान्य द्यावे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्याने योग्यवेळी फवारणी केल्यास होणारे नुकसान टाळता येईल. कोकणात सव्वा लाख हेक्टरवर आंब्याचे उत्पन्न घेतले जाते. तरीही अजून ग्रामीण भागातील शेतकरी आंबा बागायतीकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. ठरावीक आंबा बागायतदार शेतकरी योग्य काळजी घेऊन आपले उत्पन्न घेत आहेत. काढणीपश्चात व्यवस्थापनाचीसुद्धा शेतकऱ्याने काळजी घेणे गरजेचे आहे.
आंबा पिकावर अवकृपा
By admin | Updated: November 16, 2014 00:24 IST