पुरळ : शेतीला व बागायतींना योग्य प्रमाणात पोषक असा पाऊस पडत आहे. मात्र, आंबा कलमांना मोहोर न आल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश आंबा कलमे पानझडी झाल्याचे दिसून येत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कल्टार तसेच रासायनिक खतांचाही वापर केल्याने आंबा कलमांमध्ये असमतोलपणा निर्माण झाला आहे. सेंद्रीय खतांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. अन्यथा देवगड हापूस आंबा कलमांची लागवड घटू शकते.दरवर्षी सर्वसाधारणपणे मे महिन्यामध्ये किंवा जूनमध्ये कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी येत असते. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत या कलमांना पालवी न आल्याने कलमे पानझडी झाली आहेत. कल्टारचा जास्त प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच बनावट किटकनाशके, खते यांमधून आंबा कलमांना नको असलेले घटक पुरविले जातात. यामुळे या कलमांचा समतोलपणा बिघडून कलमांना पालवी न येणे, आंबा उत्पन्न घटणे असे अनेक रोग निर्माण होतात. कृषी विभागाने यापुढे लक्ष देणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळे आज आंबा कलमांवर संशोधन करणे किंवा त्यावर लक्ष देणे हे काम करीत नसल्यानेच अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. भविष्यामध्ये देवगड हापूस आंब्याची लागवड संपुष्टात येण्याचीही चिन्हे दिसत आहेत. सध्या देवगड तालुक्यामध्ये १२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड आहे. (वार्ताहर)कलमांवर किटकनाशक फवारणी करावी देवगड हापूस आंबा कलमांची योग्य प्रमाणात व कृषी सल्ल्यानुसार मशागत व देखभाल केली पाहिजे. सध्या आंबा कलमांना पालवी न येण्याची कारणे अनेक आहेत. मात्र बागायतदारांनी कृषी सल्ल्यानुसार कलमांना किटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. सध्या पावसाळ््यामध्येही तुडतुड्यांचे कलमांवर जास्त प्रमाण आहे. यामुळे पालवी येण्यास विलंब होत आहे. या तुडतुड्यांवर किटकनाशकांची फवारणी केल्यास चांगली पालवी येऊ शकते. कलमे मोहोरल्यानंतरच फवारणी करायची असते. तशीच इतरवेळीही पालवी येण्यासाठी कलमांना फवारणी केली पाहिजे, अशी माहिती प्रकाश गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आंबा कलमांची पानझडी--देवगड हापूसची स्थिती
By admin | Updated: September 16, 2014 23:25 IST