मालवण : तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना भातपीक संरक्षणासाठी दिली जाणारी रोगप्रतिबंधक औषधे व किटकनाशके तालुका कृषी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे अद्याप तालुक्यात न आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना भातशेतीवर पडलेल्या लष्करी अळी व करपा रोगाशी सामना करावा लागत आहे. याबाबत शासनस्तरावर चौकशी करण्यात यावी, अशा प्रकारची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही डॉन्टस यांनी केले आहे. मालवण तालुक्यात किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी जमिनीवर भाताची पेरणी केली होती. त्याची रोपे उगवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस लांबणीवर पडल्याने या भातशेतीवर लष्करी अळीचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातशेती पूर्ण धोक्यात आली आहे. लष्करी अळी व करपा रोगाशी मुकाबला करण्यासाठी शासनाच्यावतीने गेली काही वर्षे तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत पंचायत समितीमार्फत भातपीक संरक्षणासाठी रोगप्रतिबंधक औषधांचे नियोजन केले जायचे. मात्र, पंचायत समितीकडील ही योजना तालुका कृषी कार्यालयाकडे हस्तांतरीत केली गेली. शेतकऱ्यांना रोगप्रतिबंधक औषधांचे वाटप योग्य वेळेत व्हावे याची जबाबदारी तालुका कृषी कार्यालयाची असताना तालुका कृषी कार्यालयाने आपली बेपर्वाई वृत्ती दाखविल्याने शेतकऱ्यांना लष्करी अळी व करपा रोगांशी सामना करावा लागत आहे. मालवण तालुक्यातील वराड, पेंडूर, तळगाव या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणीही भातशेत जमिनीवर लष्करी अळी व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र, तालुका कृषी कार्यालयाने रोगप्रतिबंधक औषधे शेतकऱ्यांना दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉटस यांनी वराड, पेंडूर या गावचा दौरा करून भातशेतीची पाहणी केली असता भातशेतीवर लष्करी अळी व करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत डॉन्टस यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित खते, औषधे व किटकनाशकांची मागणी कणकवली येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे सांगण्यात आले. तालुका कृषी कार्यालयाने वेळेत औषधांची मागणी केली असती तर आज शेतकऱ्यांवर ही पाळी आली नसती अशी प्रतिक्रिया डॉन्टस यांनी व्यक्त करून कृषी कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभार आणि तहान लागताच विहीर खोदण्याच्या वृत्तीमुळे शेतकरी अडचणीत आले असल्याचे डॉन्टस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कृषी कार्यालयाचा गलथान कारभार
By admin | Updated: June 27, 2014 00:42 IST