मंदार गोयथळे - असगोली -शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या साठवणीसाठी विविध खात्यांमार्फ त बंधारे व धरणे बांधली जातात. मात्र, यातील बहुतांश बंधारे तसेच धरणे अर्धवट व दर्जाहीन कामामुळे पाणी साठवण करण्यात कमी पडत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील बंधारे व धरणांची स्थिती पाहून समोर येत आहे.कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, पावसामुळे पृथ्वीवर जमा होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे शासनाला योग्य प्रकारे जमत नाही. त्यामुळे दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारी अखेरीस ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण होते. यावर उपाययोजना म्हणून दरवर्षी कृ षी विभाग व ग्रामपंचायतमार्फत बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली जाते. यामध्ये कच्चे तसेच पक्के बंधारे बांधले जातात. काहीवेळा ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तर काही वेळा श्रमदानातूनही हे बंधारे बांधण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. सिमेंट पिशव्यांच्या व दगड मातीच्या सहाय्याने हे बंधारे घातले जातात. मात्र, प्रत्यक्षात या सर्व खटाटोपामुळे किती प्रमाणात पाणी अडवण्यात शासन प्रत्यक्षात यशस्वी ठरते हादेखील एक संशोधनाचा विषय बनला आहे. दरवर्षी पावसाळा संपताच विशेषत: ग्रामीण भागातून सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी सर्रास बंधारे बांधण्याची मोहीम राबवली जाते. मात्र, गतवर्षीपासून हे प्रमाणही काही ठिकाणी कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यानंतर विविध मार्गाने वापरात येणारे पाणी अडवण्यासाठी कधी कधी तर येथील नागरिकांनाच पुढे सरसावावे लागत आहे. श्रमदानातून विविध ठिकाणी ग्रामीण भागातील मोक्याच्या पाणवठ्याच्या ठिकाणी हे बंधारे आजही त्या त्या ठिकाणी असणारे नागरिक बांधत आहेत.ग्रामीण भागात हे तात्पुरते बंधारे दरवर्षी पावसाळा संपताच बांधले जात असले तरीदेखील काही ठिकाणी काळ्या दगडांचा व सिमेंटचा वापर करुन पक्के बंधारे व धरणे बांधली गेली आहेत. मात्र, एकदा ही धरणे बांधून झाल्यानंतर त्याकडे शासनाने जराही ढुंकून न पाहिल्याने हे बंधारे व धरणे कोसळून पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तळवली येथील अशाच पद्धतीने काही वर्षांपूर्वी शासनाकडून बांधण्यात आलेला सिमेंटचा बंधारा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या बंधाऱ्यास गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, ढासळणाऱ्या दगडांमुळे हा बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पाणी अडवण्यास हा बंधारा कमकुवत ठरला आहे. हीच अवस्था अन्य बंधारे व धरणांच्या बाबतीत आहे. एकूण विविध ठिकाणच्या धरणांची स्थिती पाहता पाणी साठवण करण्यात आजही उदासिन असल्याचे समोर येत आहे.
पाझरणाऱ्या बंधाऱ्यांमधून पाणी जिरणार
By admin | Updated: October 28, 2014 00:18 IST