चिपळूण : कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चिपळूण एस. टी. आगाराला सध्या घरघर लागली आहे. या आगारात दिवसाला ५ लाख ७८ हजार रुपयांचा, तर महिन्याला १ कोटी ७९ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. नादुरुस्त गाड्या, गाड्यांच्या वेळेची अनिश्चितता, कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा, सुरक्षेची हमी नाही, सकारात्मकतेचा अभाव यामुळे हा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. एस. टी. महामंडळ तोट्यात आहे, असे सातत्याने सांगितले जाते. तोटा होत असल्याने चिपळूण आगार बंद करण्याची भूमिकाही प्रशासन पातळीवर सुरु आहे. चिपळूण आगार तोट्यात सुरू आहे. याला कारणेही अनेक आहेत. आगारात असणाऱ्या गाड्या स्वच्छ व सुव्यवस्थेत नाहीत. गाडी फलाटावर लागल्यानंतर ती वेळेवर सुटेल किंवा नियोजितस्थळी सुखरुप पोहोचेल याची हमी देता येत नाही. नादुरुस्त व गळक्या गाड्यांची वेळच्यावेळी देखभाल दुरुस्ती होत नाही. गाडीत चढल्यानंतर प्रवाशांना प्रसन्न वाटत नाही. अनेक वेळा गाडीत धूळ असते. अस्वच्छता असते व उग्रवास असतो. या कळकट वासामुळे अनेक प्रवाशांना उलट्याही होतात. गरगरु लागते. एस. टी.ने स्वच्छ व चांगल्या गाड्या पुरविल्या, त्या वेळेत सोडल्या व प्रवाशांच्या मर्जीनुसार चढउतार केले तरच एस. टी.ला भविष्यात चांगले दिवस येतील. एस. टी.चे बहुतांश कर्मचारी प्रवाशांशी सौजन्याने वागत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे येत असतात. तक्रार करुनही अनेकवेळा कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जाते. एखाद्या अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा उगारला, तर संघटना किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या चूक करणाऱ्या कर्मचाऱ्याची पाठराखण केली जाते आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा बळी दिला जातो. चुकीचे काम करणाऱ्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रकार थांबला, तर कर्मचारीही आपले काम प्रामाणिकपणे करतील. हात दाखवा, एस. टी. थांबवा अशी योजना काढण्यात आली होती. चिपळूण आगारातून दररोज ३६ हजार किलोमीटर गाड्या चालविल्या जातात. या गाड्या भरुन गेल्या व भरुन आल्या तरच उत्पन्न वाढणार आहे. अनेक वेळा दोन - चार प्रवाशांसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास होतो. त्यामुळे एस. टी.च्या उत्पन्नात घट होते. गाडी फलाटावरुन बाहेर पडल्यानंतर प्रवाशांच्या विनंतीनुसार थांबविली जात नाही. हात दाखवूनही गाडी पुढे नेली जाते. रिकामी असूनही गाडी न थांबवताच पुढे नेल्याने एस. टी.चा तोटा वाढतो. चालक - वाहकाने गाडी भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरच एस. टी. जगणार आहे. गाड्या निर्धारित वेळेत सुटल्या तरच प्रवासी एस. टी.त बसतील. पण, तसे केले जात नाही. अशा लहान-मोठ्या अनेक तक्रारींमुळे एस. टी.ची स्थिती नाजूक बनत आहे. एस. टी. कामगार संघटनांचा प्रशासनावर दबाव राहतो. त्यामुळे प्रशासनाला काम करणे अवघड होते. प्रवाशांची विश्वासार्हता जपली गेली, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गाडीत स्वच्छता व सुरक्षितता असेल तरच प्रवासी एस. टी.ने प्रवास करतील. त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. अन्यथा एस. टी.चा हा तोटा अधिकच वाढण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) एस. टी.च्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी गाड्यांच्या नियोजनाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काही कर्मचारी नाहक दबाव टाकतात. त्यामुळे संघटनांचा व लोकप्रतिनिधींचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव वाढतो व चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा भोगावी लागते. असे प्रकार घडत असल्याने प्रशासनात कठोर धोरण स्वीकारण्यास कोणी धजावत नाही. आमच्याकडे नवनवीन गाड्या आहेत. त्याद्वारे अनेक फेऱ्या होतात. मात्र, गाड्या धुण्यासाठी माणसे कमी असल्याने सर्वच गाड्या स्वच्छ ठेवता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. चालक - वाहकांबद्दल काही तक्रारी येतात. त्याबाबतही प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जाते. माणूसकी ठेवून आम्ही कामकाज करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी एस. टी. जगली, तरच सर्वांना किंमत राहणार आहे. याची जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवायला हवी. सर्वांनी एकत्र येऊन काम केले तरच एस. टी.ला चांगले दिवस येतील. शेवटी प्रवासी हा आपला देव आहे. त्याला सोयी सुविधा मिळायला हव्यात. - राजेश पाथरे, स्थानकप्रमुख चिपळूण
एकत्र येऊन काम केल्यास फायदा दर दिवशी लाखोंचा तोटा
By admin | Updated: January 28, 2015 00:53 IST