तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांच्या प्रयत्नातून सन १९७६-७७ साली कुडाळ येथे एमआयडीसी उभारण्यात आली. सुरुवातीला या ठिकाणी वायमन गार्डन, मेल्ट्रॉन यासारख्या कंपन्यांनी मोठे कारखाने उभारले होते. त्याकाळी जिल्हाभरातून कुडाळ एमआयडीसीमध्ये लोक कामाला येत. परंतु काही वर्षातच येथील उद्योग, कारखाने बंद पडू लागले. याची प्रमुख कारणे म्हणजे मुंबई-गोवा शहरांची झपाट्याने होणारी वाढ, मालाची ने-आण करण्यासाठी वाहतुकीची समस्या, कामगारांची कमी उपलब्धता आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची एमआयडीसी विषयी उदासिनता. मोठे उद्योग बंद पडू लागल्याने त्यावर आधारीत लघु उद्योगही संकटात आले. मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुकीची समस्या, पर्यटन जिल्हा असल्याने पर्यावरणास घातक उद्योगांना असलेला विरोध, एमआयडीसीकडून उद्योजकांना मिळणारे असहकार्य यामुळे येथील उद्योगांना पुन्हा उर्जितावस्था मिळण्याची शक्यता धूसरच आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून येथील नैसर्गिक साधन संपत्तीवरील उद्योग-व्यवसायांना चालना देणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये काजू, आंबा, फणस, कोकम, जांभूळ, मत्स्य या व अशा घटकांवर आधारीत उद्योगांना प्रशासनाने प्रोत्साहन आणि मदत देणे आवश्यक आहे. जिल्ह्याला समृद्ध असा समुद्रकिनारा लाभल्याने येथे मत्स्य व्यवसायही आता जोर धरू लागला असून येथील मत्स्योत्पादन देशभरात आणि परदेशातही निर्यात होत आहे. मात्र, याचे प्रमाण कमीच असून मत्स्य व्यवसायवाढीसाठी चालना मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरेल.‘जिल्हा उद्योग मित्र’ मध्ये उद्योगांसंदर्भात विविध समस्यांवर चर्चा होते. मात्र, समस्या निराकरणासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत. केवळ समन्वयाचे काम केले जाते. त्यामुळे या समस्या सोडविण्याकरिता कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उद्योजकांमधून उपस्थित होत आहे. रजनीकांत कदम
कुडाळ एमआयडीसीला घरघर सिंधुदुर्ग जिल्ह्यात
By admin | Updated: December 25, 2014 00:01 IST