रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ‘मागेल त्याला एस. टी. व मागेल तेथून एस. टी.’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असून, यापुढे रस्त्यावर ब्रेक डाऊन एस. टी. दिसणार नाही. डिसेंबरमध्ये रत्नागिरी विभागाला २५ नवीन गाड्या उपलब्ध होणार आहेत. चालकांचे प्रशिक्षण सुरू असून, नवीन चालक मिळणार आहेत. त्यामुळे यापुढे गावच्या सरपंचाला एस. टी. मागणीबाबत विचारण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रत्नागिरी विभागात ७९० गाड्या असून, मार्चअखेर १०० नवीन गाड्या प्राप्त होणार आहेत. पैकी १३ गाड्या प्राप्त झाल्या असून, रत्नागिरी विभागात त्या प्रत्येक आगाराला देण्यात आल्या आहेत. डिसेंबरअखेर २५ नवीन गाड्या उपलब्ध होणार आहेत. शाळांसाठी, गावासाठी एस. टी. फेऱ्यांच्या मागणीसंदर्भात सरपंचाला विचारण्यात येणार आहे. मागणीप्रमाणे एस. टी. पुरविण्यात येणार आहे. विभागातील नऊ आगारांमध्ये दररोज एकूण ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो. दररोज विभागाला ५०,००० लीटर डिझेल लागते. विभागात १४७३ चालक असून, १६०० वाहक आहेत. वाहकांच्या तुलनेत चालकांची संख्या कमी आहे. परिणामी चालकांना दुहेरी ड्युटी करावी लागते. सध्या २४० चालकांचे प्रशिक्षण सुरू असून, महिनाभरात नवीन चालक रूजू होणार आहेत. नवीन चालकांची प्रत्येक आगारात आवश्यक तितक्या जागेवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात चालकाअभावी फेरी रद्द करण्याची वेळ यापुढे येणार नाही. विभागीय कार्यशाळेत एस. टी.ची दुरूस्ती करण्यात येते. कार्यशाळेत पर्यवेक्षकांची पाच पदे मंजूर असून, चार नियुक्त आहेत. प्रमुख कारागीर पदे १२ मंजूर असून, सर्व पदे भरलेली आहेत. कनिष्ठ कारागीर १५०पैकी ७७, तर सहाय्यक कारागीर ६४ पैकी ३४, सहाय्यक १३३ पैकी ७५ आहेत. कनिष्ठ व सहाय्यक कारागिरांची संख्या मंजूर पदापेक्षा निम्मी असली तरी लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात रस्त्यात बंद पडलेली एस. टी., किंवा ब्रेकडाऊन झालेली एस. टी. दिसणार नाही, असा दावा विभाग नियंत्रक देशमुख यांनी केला आहे. ग्रामस्थ व प्रवाशांकडून येणाऱ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. रात्रवस्तीच्या गाड्या घेऊन जाणाऱ्या चालक - वाहकांना शौचालयाचा उद्भवणारा प्रश्न जिल्हा प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने सोडविण्यात येणार आहे. याबाबत सतत पाठपुरावा सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या वाडीवस्तीवर विखुरला आहे. एस. टी.मुळे ग्रामीण भाग शहराजवळ आला आहे. एकूणच ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे एस्. टी.चे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणारे काम झाले तर महामंडळाला कधीच तोटा पाहावा लागणार नाही. सर्वसामान्य प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देऊन जोडून ठेवणे, असाच आम्हा सर्वांचा प्रयत्न असेल. - के. बी. देशमुख, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
आता मागेल त्याला एस. टी.!
By admin | Updated: November 18, 2014 23:29 IST