बांदा : इन्सुली-कुडवटेंब येथील भारती भरत केरकर (वय ४८) या विवाहितेने घरात कोणीही नसल्याचे पाहून आपल्या राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. भरत केरकर हे आपल्या कुटुंबियांसह कुडवटेंब येथे राहतात. याठिकाणीच त्यांचे दुकान आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकानात गेले होते. तर मुलगी सावंतवाडी येथे नोकरीला व मुलगा बाहेर गेला होता. भारती या घरात एकट्याच होत्या. सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास भारती यांचा भाऊ महादेव सातार्डेकर हा भरत केरकर यांच्या दुकानात आला होता. त्यानंतर ते दोघेही घरी गेले असता घराचा दरवाजा उघडाच होता. मात्र घरातील आतील खोलीचा दरवाजा हा बंद होता. भारती यांना हाका मारुनही प्रतिसाद न मिळाल्याने पाठिमागील खिडकीतून पाहिले असता भारती या गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्यात. बांदा पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, उपनिरीक्षक सचिन नावडकर, हवालदार सुधीर कदम हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. भारती यांच्या पश्चात पती, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुधीर कदम करीत आहेत. (प्रतिनिधी)
इन्सुलीत विवाहितेची आत्महत्या
By admin | Updated: August 22, 2015 00:20 IST