इतक्या कोटींची कामे केली, तितके कोटी खर्च केले, अशा जाहिराती करणारे लोकप्रतिनिधीच आताच्या निवडणुकीत धोक्यात आलेले दिसत आहेत. त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी मतदार संघांमधील चित्र पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे आणि त्यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सर्वसाधारणपणे निवडणुकांना सामोरे जाताना जो आमदार असतो, त्याचे पारडे थोडे जड असते. आमदारकी असल्यामुळे वार्षिक निधी खर्च करून काही विकासकामे केलेली असतात, इतर कुठल्या ना कुठल्या योजनेचा निधी आणून लोकांच्या मागण्या पूर्ण केलेल्या असतात. सरकार दरबारी अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी आमदारकी हा एक हुकमी एक्का हातात असतो. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना निवडणूक तशी सोपी जाते. त्यांच्याच पक्षातील एखादा ताकदवान पदाधिकारी बंडखोरी करत नाही, तोपर्र्यंंत त्यांना धोका नसतो. पण अलिकडच्या काळात कोट्यवधींची कामे केल्याच्या जाहिराती केल्या तरी त्याला लोक फारसं विचारत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात दोन मंत्री पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यापैकी रत्नागिरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि पालकमंत्री असलेले उदय सामंत आता शिवसेनेत गेले आहेत. त्यांनी आपल्या एका प्रचार पत्रकावर २२५ कोटींची कामे केल्याची माहिती दिली आहे. खरं तर इतकी कामे केल्यानंतर प्रचाराची गरजच पडायला नको. पण, त्यांच्या प्रचारासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच रत्नागिरीत आले. उदय सामंत यांचे शिवसेनेत जाणे राष्ट्रवादीतील (अजून राष्ट्रवादीत असलेल्या) कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारे ठरले आहे. सामंत यांनी आपल्याला का सोडले, हेच त्यांना अजून कळलेले नाही. काहीशी अशीच बाब शिवसेनेतूनही पुढे येत आहे. आदेश हेच आमचं सर्वस्व आहे, असं मानणारे लोकही अचानक पक्षात येऊन उमेदवारी दिली गेल्याच्या प्रक्रियेबाबत नापसंती व्यक्त करत आहेत. अशा सर्वांनाच प्रचाराच्या प्रवाहात आणणे ही बाब काहीशी अवघड ठरली आहे. त्यामुळे प्रस्थापित आमदार असूनही, सामंत यांची वाट सोपी नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत अंतर्गत स्तरावर विरोधाचे वातावरण आहे. ते गुहागरमधील विद्यमान आमदार असले तरी पक्षांतर्गत नाराजीचा त्रास त्यांना होणार आहे. आपल्या मतदारसंघात कोणीही प्रचाराला येण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आपला मतदारसंघ सांभाळून ते दापोलीच्या उमेदवाराच्या प्रचारातही सहभागी झाले आहेत. त्यांनीही आमदार झाल्यापासून अनेक कामे केली आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांनी विरोधकांची संख्याही वाढवली आहे. गतवेळी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार तुल्यबळ होते आणि ही मतांची विभागणी भास्कर जाधव यांच्या पथ्यावर पडली. पण, यावेळी शिवसेनेकडून रामदास कदम यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार दोन असले तरी मतविभागणी खरोखरच होईल का, असा प्रश्न आहे. आमचा शत्रू राष्ट्रवादी आहे, हे खासदार अनंत गीते यांचे विधान काही संकेत देणारे आहे का, असा प्रश्नही आहे. काँग्रेसची जी काही मते आहेत, ती गतवेळी भास्कर जाधव यांना मिळाली होती. यावेळी ती त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे मावळलेल्या सरकारमधील दोन मंत्र्यांची वाट प्रस्थापित असूनही काहीशी बिकट झाली आहे, असे चित्र दिसत आहे.मनोज मुळ्ये
प्रस्थापितच धोक्यात
By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST