बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे कोसळलेली दरड अद्यापही जैसे थे असून सोमवारी दुपारी दरड कोसळलेल्या ठिकाणाची जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ही दरड ताबडतोब न हटविल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सहाय्यक अभियंता योगिता वळवी यांना धारेवर धरण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद विषय समितीचे सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, सरपंच मंदार कल्याणकर, अन्वर खान, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, पंचायत समिती सदस्य स्वप्निल नाईक, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई आदी उपस्थित होते. मंदार कल्याणकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात येथील दरड हटवावी, यासाठी ग्रामपंचायतीने सातत्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याशी पत्रव्यवहार केला. मात्र, वेळोवेळी याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच पावसाळयात दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रीय महामार्ग खाते आहे.यावेळी दरड कोसळलेल्या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने रस्ताच्या दुतर्फा वाहनचालकांना समजण्यासाठी ताबडतोब फलक लावण्याची मागणी केली. तसेच दरड कोसळलेल्या भागात रस्त्यावर पाणी साचत असल्याने या पाण्याचा निचराही तत्काळ करावा, तसेच कोसळलेली माती तातडीने हटवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या वर्षभरात दरडीमुळे पाचजणांना जीव गमवावा लागला असून येत्या आठ दिवसांत दरड न हटविल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी योगिता वळवी यांना दिला. (प्रतिनिधी) आश्वासनयावेळी सहाय्यक अभियंता योगिता वळवी यांनी दरड हटविण्याचे आश्वासन दिले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण एकमेव अधिकारी असून खात्याकडे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच हे काम रखडल्याचे वळवी यांनी कबूल केले. महामार्गावर दुतर्फा फलक लावण्यात येणार असून काही दिवसांतच येथील दरड पूर्णपणे हटविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महामार्ग अभियंत्यांना धरले धारेवर
By admin | Updated: July 28, 2015 21:36 IST