सावंतवाडी : महाराष्ट्र-गोवा शासनाने आश्वासन देऊनही तिलारी प्रकल्पग्रस्तांना वनटाईम सेंटलमेंटचे पैसे देत नसल्याने या प्रकल्पग्रस्तांनी येथील तिलारी कालव्यात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. पण, आमदार दीपक केसरकर यांनी आज, सोमवारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेत प्रकल्पग्रस्तांचे पैसे वेळेत दिले जावेत, अशी मागणी केली. याला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जुलैमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना भेटण्याचे निश्चित केले आहे. याबाबत माहिती अशी की, तिलारी प्रकल्पग्रस्त २५ जूनला वनटाईम सेंटलमेंंटचे पैसे मिळाले नाहीत म्हणून जलसमाधी घेणार आहेत. याची गंभीर दखल आमदार केसरकर यांनी घेत आजच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीत पर्रीकर यांनी तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटला पाहिजे, अशी भूमिका मांडली. तसेच आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना भेटण्यास उत्सुक असून, आपण तशा तारखा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयास कळवितो, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे, अशी आपली मनापासून इच्छा असून, तोडगा निघाल्यास महाराष्ट्राला तसेच गोव्यालाही त्याचा फायदा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार केसरकर उद्या, मंगळवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत. हा प्रश्न निकाली काढावा, अशी विनंती मुख्यमंत्र्याना करणार आहोत. तसेच दोडामार्गमधील प्रकल्पग्रस्तांनाही त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. लवकरच हा प्रश्न आपण सोडवू, असे आश्वासन या प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. (वार्ताहर)
तिलारी प्रकल्पग्रस्त प्रश्नी गोवा सरकार सकारात्मक
By admin | Updated: June 24, 2014 01:43 IST