शिवाजी गोरे -- दापोली -बालवयातच वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली. आईने मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकायला सुरुवात केली. संकटावर संकटे येऊ लागली. त्याही परिस्थितीत तिने सामना केला. आम्ही तीन भावंडे शाळेत जाऊ लागलो, त्यामुळे आईची एकटीची तारांबळ होऊ लागली. त्यामुळे शाळा अर्ध्यावर सोडून मी आईला मदत करण्याचे ठरवले. उत्तरप्रदेश गाझियाबाद जिल्ह्यातून दापोली तालुक्यातील हर्णै गाठले. कठीण परिस्थितीवर मात करुन तेथे जाळे विणकामाचा कुशल कारागिर बनलो, असे जुगनू मिश्रा म्हणाला.कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यावर त्या कुटुंबावर किती वाईट परिस्थिती येते, ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आमच्यावर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला. वडिलांचे निधन झाले, त्यावेळी आम्ही सर्व भावंडं ३ ते ६ वर्षांचे होतो. आईचे कष्ट पाहून मला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे शाळा सोडून आईला मदत करण्याचे ठरवले. परंतु बालमजूर म्हणून मला कोणीही काम देत नव्हते. आईच्या मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नव्हते. दोन दिवस चूलही पेटत नव्हती. त्यामुळे मी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गाझियाबाद येथील काही लोक हर्णै येथे फळविक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांनी २००६ साली मला हर्णै येथे आणले. जेवण देऊन ५० रुपये महिना मजुरी देण्याचे ठरले. एक वर्ष माझ्याकडून काम करुन घेतल्यानंतर अचानक मला कामावरुन घरी जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा माझ्यावर उपासमारीची वेळ आली. परंतु आता घरी जायचे नाही. इथेच काही तरी करुन दाखवायचे असा दृढनिश्चय केला.हर्णै येथील एका हॉटेलमध्ये काम पाहिले. महिनाभर काम केल्यावर मालकाने बालकामगार ठेवणे गुन्हा असल्याचे सांगून कामावरुन काढून टाकले. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच आपल्याला एक मच्छिमार भेटले. त्यांनी मला जाळे विणकामासाठी मजूर पाहिजे, असे सांगितले. आपण जाळे विणण्याचा निर्णय घेतला.मच्छिमारी व्यवसायाला लागणारी जाळी विणून कुटुंबाला हातभार लावण्याचा मार्ग शोधला. ७ वर्षांपूर्वी आपण या कामावर रुजू झालो. २०० रुपये महिन्यापासून सुरुवात झाली. सात वर्षांच्या मेहनतीनंतर जाळे विणकाम क्षेत्रात कुशल कामगार म्हणून परिपक्व झालो. आता आपण महिन्याला १४ हजार रुपये कमावतो. सात वर्षांपूर्वी २०० रुपयापासून जीवन जगण्याची धडपड सुरु झाली. आज आपण आपल्या कौशल्याच्या जोरावर १४ हजार रुपये महिना कमावतो. जाळे विणकामात आपला हातखंडा आहे. माशांची जाळी बनवण्याची कला मेहनतीने आत्मसात केल्याचे तो अभिमानाने सांगतो.
खडतर प्रवासाने उत्तरप्रदेशच्या जुगनूने विणले आयुष्याचे जाळ
By admin | Updated: August 13, 2014 23:32 IST