मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी कौटुंबिक जीवन जगत असताना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा त्यावर परिाणाम होत असतो. ज्या घटनांमध्ये कुटुंबापेक्षा करीयरला महत्व दिले जात आहे. यातून घडणाऱ्या विभक्तपणाच्या आणि पुन्हा एकत्रित संसारासाठी मिळालेला ‘यु टर्न’ वेगळा संदेश देवून जातो. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाने सादर केलेल्या ‘या व्याकूळ संध्यासमयी’ एक तरल काव्यात्मक नाट्यानुभव होता. कलाकारांनीदेखील आपापल्या भूमिकेस योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. फ्लॅशबॅककरिता वापरण्यात आलेले संगीत व लाईटस्चा वापर प्रभावी ठरला. रत्नागिरीत पहिल्यांदाच फ्लॅशबॅक आधारीत नाटक सादर करण्याचा प्रयत्न सफल झाला. धकाधकीच्या जीवनात मानव इतका व्यस्त झाला आहे की, त्याला स्वत:च्या कुटुंबासाठीही फारसा वेळ देता येत नाही. स्वत:चे छंद जोपासताना, स्वत:च्या आवडीनिवडी पूर्ण करण्याकरिता, स्वत:ला वाहून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, या वृत्तीचा परिणाम वैवाहिक जीवनात अडकल्यानंतर जाणवायला लागतो. याच पद्धतीचे कथानक मांडण्याचा प्रयत्न लेखक एस. मनोहर यांनी ‘या व्याकूळ संध्यासमयी’ नाटकाद्वारे केले आहे. एकाचवेळी दोन प्रसंगाचे सादरीकरण करताना फ्लॅशबॅकचे माध्यम दिग्दर्शक श्रीकांत पाटील यांनी वापरले. नाटकात एकसारखे ‘ब्लॅक आऊट’ केल्याने नाटकातील रस कमी होवू शकतो, हे टाळण्यासाठी लाईटस्चा प्रभावी वापर केला गेला. नाटक सूत्रबद्ध बांधता आलं शिवाय संगीतामुळे तरलता आली. श्रीकांत गडकरी (मिनार पाटील) हा एक साहित्यिक तर मेघा (श्वेताराणी सावंत) एक समाजसेविका दोघांचे लग्न होते. मात्र लग्नानंतर श्रीकांत व मेघा यांच्या वैवाहिक जीवनात हळुहळु समस्या निर्माण होतात. एकमेकांना वेळ द्यायलाही मिळत नाही. उभयतांमध्ये खटके उडायला लागतात. अखेर दोघेही घटस्फोटाचा निर्णय घेवून विभक्त होतात. कालांतराने समाजसेवीका मेघा त्यांच्याच संस्थेत समाजसेवक असलेल्या वेदपाठक यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते. मेघाच्या नव्या कुटुंबात श्वेता (सायली सुर्वे) नावाची मुलगी जन्माला येते. श्रीकांतच्या जीवनात सरिता नावाची नवी जीवनसाथी मिळते. सरीताचा मुलगा शेखर (प्रथमेश भाटकर) याला सांभाळण्याचा निर्णय श्रीकांत घेतो. दरम्यान श्वेता व शेखर यांची ओळख होते. दोघांमध्ये प्रेम निर्माण होते. कालांतराने वेदपाठक यांचे निधन होते. मेघा विधवा होते. मेघा व श्रीकांत एका कार्यक्रमावेळी भेटतात. भेटी वाहून पुन्हा एकदा त्यांचे सूर जुळतात. मात्र त्यासाठी त्यांची मुले श्वेता व शेखर मदत करतात. परंतु, श्वेता व शेखर यांच्या प्रेमकहाणीचे सूर मात्र व्याकूळलेले रहातात, असे या नाटकाचे कथानक आहे. नाटकाचे कथानक गुंफलेले असले तरी प्रत्येक कलाकारांनी भूमिकेला साजेसा अभिनय सादर करताना घेतलेली मेहनत दिसून येते. वार्ताहराच्या भूमिकेत सुहास साळवी, मिलींद सावंत, दत्तात्रय सावंत, शंकर वरक, समिक्षा सावंत देसाई, नितेश धुलले यांनी नाटकामध्ये आपले अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शन व पार्श्वसंगीत श्रीकांत पाटील यांनी केले आहे. नेपथ्य चंद्रकांत गावडे, मिलींद सावंत, प्रकाश योजना विलास जाधव तर रंगभूषा दादा लोगडे यांनी पाहिली. रंगमंचाचा पुरेपूर वापर करुन श्रीकांत - मेघा याचं घर तर घटस्फोटानंतर मेघा याचं स्वतंत्र घर वेगवेगळी लोकेशन्स रंगमंचावर दाखविण्यात आली. त्यासाठी कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, दिलीप सागवेकर, मंगेश पवार, सुधाकर सुर्वे, संदीप सावंत यांनी प्रयत्न केले. साधं, सरळ कथानक मांडताना नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना यांचा योग्य विचार केला गेला. कथानकात सुसूत्रता आणण्यासाठी तरलतेला ब्रेक लागू नये याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी खुबीने केला. फ्लॅशबॅक दाखवितानादेखील नाटकाचा फ्लो अखंड राहिला. आज सादर होणारे नाटक.. - काळोख देत हुंकार- सादरकर्ते : महाकाली रंगविहार, नाणिज फ्लॅशबॅककरिता वापरण्यात आलेले संगीत व लाईटस्चा वापर प्रभावी. रत्नागिरीत पहिल्यांदाच फ्लॅशबॅक आधारीत नाटक. ‘या व्याकूळ संध्यासमयी’ एक तरल काव्यात्मक नाट्यानुभव. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाने सादर केले राज्य नाट्य स्पर्धेत नाटक. कौटुंबिक नाटकाव्दारे आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न.
प्रभावी सादरीकरण ‘व्याकूळ संध्यासमयी’ राज्य नाट्य स्पर्धा
By admin | Updated: November 16, 2014 23:56 IST