पुरळ : देवगड तालुक्यामध्ये आंबा कलम मोहोराला वापरली जाणारी किटकनाशके, औषधे ही बऱ्याच प्रमाणात बनावट असल्याचे आढळून आले आहे. यामुळे यावर्षी तरी बनावट किटकनाशकांपासून आंबा बागायतदारांची सुटका होईल की पुन्हा बनावट किटकनाशके बागायतदारांना खरेदी करावी लागतात? असा प्रश्न बागायतदारांमध्ये निर्माण झाला आहे.गेल्यावर्षी महागडी किटकनाशके वापरूनही कलमांवरील किटकांचा प्रादुर्भाव दूर होत नव्हता. ही औषधे बनावट असल्याचे आढळून आले होते. यामुळे आतातरी कृषी विभाग अलर्ट राहून बनावट किटकनाशक औषधांना आळा घालून बागायतदारांची सुटका करणार की कृषी विभागाचे दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे आंबा बागायतदारांना बनावट किटकनाशकांना बळी पडावे लागते की काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे.सध्या तालुक्यामध्ये तुरळक प्रमाणात हापूस कलमांना मोहोर येत आहे तर मोठ्या प्रमाणात याच कलमांना बहारदार अशी पालवी येत आहे. या कालमांवर तुडतुडा व किटकांचे प्रमाणही जास्त असल्याचे बागायतदारांना मोहोराला व पालवीला किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. सध्या फवारणीसाठी साफरमेथीन घटक असलेले किटकनाशक औषध जास्त प्रमाणात वापरले जात आहे. साफरमेथीन हे औषध किटक दूर जाण्यास प्रभावी आहे. नोव्हेंबर ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हापूस कलमांना मोहोर येत असतो. यामुळे या कालावधीमध्ये आंबा कलमांना किटकनाशक फवारणी केली जाते. गेली काही वर्षे देवगड तालुक्यांमध्ये बनावट किटकनाशके, औषधे, बनावट कल्टारची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यामुळे परिणामी बागायतदारांना मोठा फटका बसत आहे. यावर्षी तरी कृषी विभाग अलर्ट राहून बनावट किटकनाशक औषधांना आळा घालणार की निष्काळजीपणा, दुर्लक्षपणा करून बनावट किटकनाशक औषधांना वाव देणार? कृषी विभागाच्या दुर्लक्षपणाने देवगड तालुक्यात बनावट किटकनाशके विकली जात आहेत. परजिल्ह्यातील औषध कंपनीचे एजंट येऊन येथील एजन्सीधारकांच्या माध्यमातून बागायतदारांना किटकनाशके विकली जात आहेत. यामुळे या बनावट औषधे विक्री करणाऱ्या एजंटावर योग्य कारवाई करण्यात यावी, तरच यावर आळा बसणार आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
बनावट किटकनाशकांचा धोका
By admin | Updated: November 5, 2014 22:59 IST