प्रकाश काळे -- वैभववाडी--खुल्या चारपैकी काँग्रेसला सर्वांत सुरक्षित असलेला प्रभाग पाच हा आता तितकासा ‘सेफ’ राहिलेला नाही. पक्षांतर्गत बंडाळी शमवत काँग्रेसने शहर अध्यक्ष संजय सखाराम चव्हाण यांना रिंगणात ठेवले आहे. मात्र, शिवसेना भाजप युतीसह राष्ट्रवादीनेही ऐनवेळी खेळी करीत विकास आघाडीचे उमेदवार रणजित दत्तात्रय तावडे यांना बिनशर्त पाठिंबा देऊन काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. तर मनसेने तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांना निवडणुकीत उतरवले आहे. या तावडे द्वयींमुळे चुरस वाढली असून, विकास आघाडीच्या पाठिंबानाट्यामुळे काँग्रेसचे चव्हाण यांच्यापुढे अडचणी वाढू लागल्याने हे आव्हान कसे मोडीत काढायचे या विवंचनेत सध्या काँग्रेस आहे.काँग्रेससाठी सुरक्षित असलेला प्रभाग पाच खुला राहिल्यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चव्हाण, संजय सावंत, आमदार नीतेश राणे यांचे निकटवर्तीय डॉ. राजेंद्र्र पाताडे या प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक होते. तशी तिघांचीही निवडणुकीची पूर्वतयारी झाली होती. मात्र, प्रभाग पाचऐवजी ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग दोनमध्ये मोट बांधण्याच्या पक्षांतर्गत हालचाली सुरू असल्याचे लक्षात येताच संजय सावंत यांनी सावध पवित्रा घेत निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. तर डॉ. पाताडे यांनी चव्हाण यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करुन बंडाचे निशाण फडकवले होते. काहीही झाले तरी अपक्ष लढणारच! असा पवित्रा घेतलेल्या डॉ. पाताडे यांनी नीतेश राणे यांच्या शब्दाखातर निवडणुकीतून ‘यू टर्न’ घेतला. त्यामुळे संजय चव्हाण यांचा मार्ग काहीसा मोकळा झाला.प्रभाग पाचमध्ये सक्षम उच्चविद्याविभूषितांना डावलून काँग्रेस पक्षाने संजय चव्हाण यांना पसंती दिल्याचे शल्य काहींच्या मनात असून त्याची चर्चाही खुलेआम होत आहे. परंतु शहरातही विकास आघाडीचे थोडेफार वर्चस्व असावे, या हेतूने रणजित तावडे काँग्रेसच्या चव्हाणांविरोधात उतरल्याने युतीसह राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार मागे घेत विकास आघाडीच्या रणजित तावडे यांना बिनशर्त समर्थन दिले. त्यामुळे काँग्रेसविरोधी मतदारांना सक्षम पर्याय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी दिखाऊपणा टाळून छुप्या प्रचारावर भर दिल्याचे दिसून येते.प्रभाग पाचमध्ये पोलीस ठाणे व शासकीय गोदाम परिसराचा समावेश आहे. या प्रभागाची मतदार संख्या ९९ असून बहुतांश मतदार परगावी आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मतांवर सर्वांचा डोळा असून ही मतेच या प्रभागात निर्णायक ठरणार आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीचे गुलाबराव चव्हाण व त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार संजय चव्हाण हे गुलाबरावांचे सख्खे पुतणे असल्याने राष्ट्रवादीच्या चव्हाण पितापुत्रांनी उमेदवारी मागे घेत गृहकलह टाळला आहे. परंतु विकास आघाडीच्या रणजित तावडे यांनी काँग्रेसच्या चव्हाणांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. रणजित तावडे गावातीलच असल्याने वाभवेतील ग्रामस्थांनी तावडेंच्या निवडणुकीची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले संजय चव्हाण हे सद्य:स्थितीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने हा प्रभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आमदार नीतेश राणे यांनी प्रभाग एक इतकेच याही प्रभागात लक्ष केंद्रित केले आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनीही जम बसवायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. प्रभाग पाच काँग्रेसचे संजय चव्हाण, विकास आघाडीचे रणजित तावडे व मनसेचे सचिन तावडे या तुल्यबळ उमेदवारांमुळे येथील निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी बनली आहे.मटक्यामुळे प्रभाग बदनामशासकीय गोदाम आणि पोलीस ठाण्याच्या परिसराचा समावेश प्रभाग पाचमध्ये असून गोदामाचा परिसर मटका बुकींचे केंद्र बनले आहे. मटका व्यवसाय आणि प्रभाग पाचचे नाते ‘घनिष्ठ’ आहे. हा प्रभाग मटका व्यवसायामुळे बदनाम झाला आहे. त्यामुळे मतदार कोणाला साथ देणार याचे सर्वांनाच औत्सुक्य आहे.
तुल्यबळ उमेदवारांमुळे चुरस
By admin | Updated: October 29, 2015 00:16 IST