सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सीसीटीव्ही देण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. या चोऱ्यांचा तपास तातडीने व्हावा, अशा सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. वेंगुर्ले मायनिंगबाबत शिवसेना जनतेसोबत असून लोकांचा विरोध झाल्यास सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पंचायत समिती सदस्य अशोक दळवी उपस्थित होते.ओरोस येथे नियोजन मंडळाचा हॉल बांधण्यात आला असून या हॉलचे उद्घाटन ९ जुलैला होणार आहे. त्या दिवशी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ही विकास परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी असणार आहे. यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांची मते जाणून घेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ११ जुलैला नियोजन सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. वेंगुर्ले येथे सिलिका मायनिंग सुरू करण्यात येत असून त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध असेल तर शिवसेना स्थानिक नागरिकांच्या बाजूने राहणार असून, सरकार दरबारीही त्यांना योग्य तो न्याय मिळेल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच पर्यावरण अहवाल मराठीतून देण्याची जबाबदारी कंपनीची असून जिल्हाधिकारी त्यात योग्य तो निर्णय घेतील, असे मंत्री केसरकर म्हणाले. (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या लक्षात घेता पोलीस सर्व पद्धतीने तपास यंत्रणा राबवत असून, यात पोलीस नक्कीच यशस्वी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतही विचार सुरू आहे. हे कॅमेरे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून लावण्यात येणार असून त्यांची चाचपणी सुरू आहे.- दीपक केसरकर, पालकमंत्री
सिंधुदुर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
By admin | Updated: July 6, 2015 00:31 IST