विष्णुपंत राऊत सांगतात... ''तो'' दिवस सुवर्णमय!
कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गाव म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी. या गावाचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. १९४० च्या दशकात स्वातंत्र्यासाठी मोठा उठाव झाला होता आणि हा उठाव, स्वातंत्र्याची चळवळ, तसेच स्वतंत्र भारताची पहिली पहाट अनुभवण्याचे भाग्य गावातील विष्णुपंत परशुराम राऊत यांना लाभले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या विष्णुपंत राऊत यांचे वय सध्या ८८ वर्ष आहे. मात्र, स्वतंत्र भारताची ''ती'' पहिली पहाट त्यांना आजही जशीच्या तशी आठवते. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच तो दिवस होता, असे ते अभिमानाने सांगतात.
स्वातंत्र्यलढा सुरू असताना तांबवे गावातही चळवळ उभी राहिली होती. सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये कोयना नदीच्या काठावर हे गाव वसले आहे. १९४० च्या दशकात गावामध्ये स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला असताना इंग्रजांनी ही चळवळ हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावच्या चारी बाजूंनी कोयना नदीचे पाणी असल्यामुळे इंग्रजांना गावात जाणे शक्य होत नव्हते. १९४२ च्या भारत छोडो व प्रतिसरकार चळवळीमध्ये गावातील स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेतला होता. यशवंतराव चव्हाण, नागनाथ नायकवडी असे अनेक लोक भूमिगत म्हणून तांबवे गावात त्यावेळी राहिले होते.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला आणि तो दिवस तांबवे गावात मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. विष्णुपंत राऊत सांगतात की, त्यावेळी माझे वय अवघ्या दहा वर्षाचे होते. मी शाळेत शिक्षण घेत होतो. गावातील मधला पार स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे ठिकाण होते. तेथे आदल्या दिवशी सर्व स्वातंत्र्यसैनिक एकत्रित आले. त्यामध्ये महिलाही सहभागी होत्या. त्यांनी गावामध्ये झेडांवदन करायचे ठरवले. त्याची जय्यत तयारीही केली. इंग्रज देश सोडून जाणार होते. अनेक वर्षांपासून हवे असलेले स्वातंत्र्य देशाला मिळणार होते. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट केले, तुरुंगवास भोगला होता त्यांच्या प्रयत्नांना यश येणार होते. त्यामुळे तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच होता .१५ ऑगस्ट १९४७ रोजी सकाळी साडेसात वाजता स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते तांबवे गावात मधल्या पाराजवळ झेंडावंदन घेण्यात आले. त्यावेळी भारत ''माता की जय'' अशा घोषणा देण्यात आल्या. गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
त्यावेळी कृष्णा दौलत पाटील हे सरपंच होते. ग्रामपंचायत चावडीची जुनी पत्र्याची इमारत होती आणि या इमारतीसमोर सरपंच कृष्णा पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. आण्णा बाळा पाटील, जयसिंग बापू, रंगनाथ पाटील, नारायण ताटे, राजाराम फल्ले, ज्ञानदेव साठे, तानाजी काटवटे त्यावेळी उपस्थित होते.
- चौकट
... अन् महिलांनी तिरंग्याला मिठी मारली
९ ऑगस्ट १९४२ रोजी यशवंतराव चव्हाण यांनी कऱ्हाडमध्ये टिळक हायस्कूल येथे झेंडावंदन केले. त्यावेळी तांबवे गावातील युवकांनी मधल्या पाराजवळ गांधी चौकात ३५ ते ४० फूट उंचीचा तिरंगा फडकावला होता. काशीनाथ देशमुख, पांडुरंग सुर्वे, शंकर भोसले, तुकाराम फल्ले, रघुनाथ फल्ले, रामचंद्र पाटील, रंगनाथ आप्पा पाटील, अण्णा बाळा पाटील हे स्वातंत्र्यसैनिक त्यामध्ये सहभागी झाले होते. इंग्रजांना हे समजल्यानंतर ते गावात पलटण घेऊन आले. त्यांनी तिरंगा उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी गावातील कासाबाई धोंडूबाई चाटे, तानुबाई पाटील यांच्यासह अन्य महिलांनी झेंड्याला मिठी मारली.
फोटो : १४विष्णुपंत राऊत