फलटण : चारित्र्याच्या संशयावरून तीसवर्षीय पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून पतीने तिचा खून केल्याची घटना घडली. रविवारी मध्यरात्री फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथे हा प्रकार घडला. खुनानंतर बेपत्ता झालेल्या पतीने बाहेर जाऊन विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर उपचार सुरू असून, जाचहाटप्रकरणी सासू, सासरा व दीराच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुनीता महादेव गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटकेवस्ती येथील महादेव माळाजी गायकवाड व सुनीता या दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडणे होत होती. त्यांना बारा वर्षांची मुलगी व दहा वर्षांचा मुलगा आहे. मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहते. सततच्या त्रासाला कंटाळून सुनीता काही दिवस माहेरी राहिली होती. पाच-सहा दिवसांपूर्वी पुन्हा ती पतीकडे आली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुनीता गाढ झोपेत असतानाच पती महादेवने धारदार कुऱ्हाडीने सुनीताच्या मानेवर घाव घालून खून केला. हा आघात झोपेत झाल्याने बाहेर कोणालाही काही समजले नाही. कॉटवर झोपलेल्या मुलालाही याची माहिती सकाळपर्यंत नव्हती. खून केल्यानंतर महादेव गायकवाड तेथून पळून गेला. जाताना दरवाजा अर्धवट उघडा ठेवून गेला. सकाळी साडेसहाच्या सुमारास सुनीता का उठली नाही, हे बघण्यासाठी तिची सासू कुपदी तेथे आली, तेव्हा सुनीता मृतावस्थेत आढळली. हा प्रकार पाहिल्यानंतर सासूने आरडाओरड करत नवरा व दुसऱ्या मुलाला याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ व नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली. फलटण ग्रामीण पोलिसांनी सुनीताचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून बेपत्ता पती महादेवचा शोध घेतला. मात्र, त्याचा तपास लागला नाही. दुपारी सुनीताचे माहेरचे नातेवाईक काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथून खटकेवस्तीत आले. दरम्यान, गावातच लपून बसलेला महादेव सायंकाळी चारला विषप्राशन करून अचानक घरी आला. तेथे उपस्थित पोलिसांनी त्याला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खूनप्रकरणी महादेव गायकवाडवर गुन्हा नोंदविला असून, जाचहाटप्रकरणी सासरा माळाजी, सासू कुपदी, दीर संजय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी) अंत्यसंस्कार करण्यास नकार शवविच्छेदनानंतर सुनीताच्या नातेवाइकांनी महादेवला आमच्या ताब्यात दिल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस व ग्रामस्थांनी समजूत घातल्यानंतर सुनीतावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वीही हल्ला महादेव गायकवाड याने २००८ मध्येही पत्नी सुनीताला कुऱ्हाड फेकून मारली होती. ती तिच्या पायाच्या बोटांवर लागून जखमी झाली होती. त्यावेळी ती माहेरी निघून गेली होती. पुन्हा असे करणार नाही, असे महादेवने स्टॅम्पवर लिहून दिले होते. त्यानंतरही चार-पाच वर्षे किरकोळ खटके उडत होते. यावर्षी मे महिन्यात भावाच्या लग्नासाठी माहेरी गेली होती. जूनच्या प्रारंभी ती पुन्हा माहेरी गेली. गावातील काही लोकांनी मध्यस्थी केल्यावर चार-पाच दिवसांपूर्वीच सासरी आली होती.
गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीचा खून
By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST