सचिन काकडे - सातारा -रात्री १२ वाजून ३ मिनिटांनी ‘लोकमत’टीम सदर बझार परिसरात पोहोचली. काही युवकांच्या कट्ट्यावर बसून गप्पा सुरू होत्या. तर काही मोबाईलवर गाणी लावून स्वत:ही ‘सैराट’ झाली होती. काही मिनिटांतच त्या सहा-सात युवकांमधील एकजण ताडकन् उभा राहिला आणि म्हणाला, ‘चला उठा रे, अजून भरपूर बॅनर लावायचे आहेत,’ असे सांगताच युवक पटापट उठले अन् हातामध्ये दोरी, शिडी व बॅनरसाठी लागणारे साहित्य घेऊन जवळच असलेल्या एका चौकात येऊन थांबले. एवढ्या रात्री तुम्ही कोणाचे बॅनर लावता आणि का? असा प्रश्न ‘लोकमत’टीमने त्या युवकांना केला. यावर त्यातील एकजण म्हणाला, ‘साहेब आम्ही दिवसभर पोटासाठी कष्ट करतो; मात्र काही व्यक्तींच्या ‘प्रतिष्ठे’साठी आम्ही रात्री बॅनर लावण्याचे काम करतो. उन्हामुळे दिवसा हे काम करता येत नाही. रात्री आमचा कोणाला ना कोणाचा आम्हाला त्रास होतो. बॅनर लावून थोडेफार पैसे मिळतात. त्याचा पोटासाठीच उपयोग होतो. आमच्यासाठी दिवस काय अन् रात्र दोन्ही सारखेच असल्यासारखे आहे.रात्रीचे १२ वाजून २० मिनिटांनी ‘टीम’ सदर बझार येथून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पोहोचली. महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा आवाज ऐकू येत होता. पोवई नाक्याकडे परतताना एक दुकान उघडे दिसले. त्या दुकानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. दोन कामगार भिंतीवर सिमेंट थापत होते. एवढ्या रात्री काम का करता? असे त्यांना ‘टीम’ने विचारले. यावर त्यांनी, ‘एमर्जन्सी’ आहे. कामाचे पैसे पण वाढीव मिळणार आहेत. म्हणून काम हाती घेतले आहे,’ असे सांगण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यावर आलेली झोप स्पष्ट दिसत होती. मात्र, त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा ‘पोटासाठी’च धडपड सुरू होती. अपने हाथ और पैर ही ब्रेक का काम करते हैं..१२ वाजून ३० मिनिटांनी ‘लोकमत टीम’ पोवई नाक्यावर आली. यावेळी एक पाणीपुरीची गाडी दोन व्यक्ती ढकलत निघाले होते. अवजड वस्तूंमुळे पोवई नाक्यावरील तीव्र उतारावर गाडीचा तोल सावरताना त्या दोघांची मोठी कसरत सुरू होती. एकजण गाडी ढकलत होता तर दुसऱ्याने गाडीचा वेग नियंत्रित राहावा, यासाठी गाडीच्या पुढे उलटा उभा राहून गाडीला धरून ठेवले होते. त्यांना याबाबत विचारले असता, ‘अपने हाथ और पैर ही ब्रेक का काम करते हैं,’ असे उत्तर त्यांनी ‘टीम’ला दिले. १२ वाजून ४५ मिनिटांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ‘टीम’ पोहोचली. याठिकाणी असलेल्या चायनीज व इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या; मात्र काही दुकानदारांची साफसफाई सुरू होती. त्यांना विचारले असता, ‘कचऱ्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे आम्ही दुकान बंद केल्यानंतर कचरा गोळा करतो व त्याची विल्हेवाट लावतो,’ असे मार्मिक उत्तर त्यांनी ‘लोकमत टीम’ला दिले.
दिवसा ‘पोटासाठी’ तर रात्री ‘प्रतिष्ठे’साठी काम !
By admin | Updated: May 24, 2016 00:56 IST