मलकापूर : सिमेंटचे वाढते जंगल व मोकळ्या पठारावर अतिक्रमण करून माणूसच जंगलापर्यंत पोहोचला आहे. धावपळीच्या जीवनात शहरीकरणाचा ओढा वाढतच आहे. या गोष्टींचा दुष्परिणाम म्हणून सध्या जंगली व रानटी प्राण्यांचे दर्शन दिवसेंदिवस दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे नव्या पिढीला प्राण्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांमधूनच ओळख करून देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ही कमतरता विचारात घेऊन हा आपल्या उदरनिर्वाहाचा एक मार्ग बनवत सध्या कऱ्हाड-मलकापूर परिसरात प्राण्यांचा रस्त्यावरच बाजार भरत आहे.वाढते शहरीकरण व औद्योगिक विकास म्हटलं की, रस्ते व नागरी वस्त्यांचे प्रमाण आपोआपच वाढते. या विकासाचा दुष्परिणाम म्हणून या ना त्या कारणाने सध्या भरमसाठ वृक्षतोड होत आहे. शहरीकरणामुळे मोठमोठ्या इमारतींची सिमेंटची जंगले निर्माण होत आहेत. या सर्वांचा निसर्गाचा समतोल बिघडण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. गावांपासून काही अंतरावरील शेतशिवारात सहजपणे दिसणारे हरीण, काळविट, ससा अशा प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने हे प्राणी पाहणे म्हणजे दुर्मिळ क्षण बनला आहे. या प्राण्यांबरोबरच भरमसाठ जंगलतोड होत असल्यामुळे जंगली प्राण्यांचे प्रमाणही घटत आहे, ही शोकांतिका आहे.शहरीकरणामुळे नोकरी व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने आज जवळ- जवळ ७० टक्के लोक नागरीवस्तीत वास्तव्यास आहेत. गेली काही वर्षांपासून नागरी वस्तीत जन्म घेतलेल्या नव्या पिढीला जंगली, रानटी व पाळीव प्राण्यांना ओळखण्यासाठी प्राण्यांचे पुतळे, खेळणी किंवा छायाचित्राचांच आधार घ्यावा लागत आहे. यासाठी वह्या-पुस्तकांबरोबरच शालेय वस्तू विक्री दुकानातून प्राण्यांचे वेगवेगळे चार्टही विक्रीस ठेवले गेले आहेत. शाळेतूनही प्रोजेक्टसाठी अशाच चित्रांचा व माहितीचा सर्रास उपयोग केला जात आहे. समाजाची हीच कमतरता ओळखून काही व्यावसायिकांनी प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बनवून शोपीस म्हणून विक्रीस ठेवले आहेत. त्यांच्या किमतीही भरमसाठ आहेत. सध्या कऱ्हाड व मलकापूर परिसरात लाकूड व इतर साहित्यापासून हरीण, वाघ, सिंह, घोडे, काळविट यासारख्या लहान मोठ्या प्राण्यांच्या प्रतिकृतींचा बाजार पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)प्राण्यांची वाढती शिकारहरीण, वाघ, बिबट्या यासारख्या जंगली प्राण्यांची शिकार करून कातडी व अवयवांची तस्करी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर खाण्यासाठी अन्न न मिळाल्याने काही प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वांमुळे प्राण्याची संख्याही घटत आहे. पवनचक्क्यांचे जाळेजंगलातून बाहेर पडून भटकंती करीत अन्न मिळविण्यासाठी प्राणी पठारावर यायचे; पण सध्या डोंगर पठारावर पवनचक्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे पठारेच नामशेष झाली आहेत. पवनचक्क्यांच्या आवाजामुळे प्राणी स्थलांतरित होत आहेत. माळरानावर फिरायला गेल्यास पूर्वी ससा, कोल्हा, लांडगे, साळिंदर आदी प्राणी दिसायचे; मात्र सध्या शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे या प्राण्यांचा वावर कमी झाला आहे. डोंगर पायथ्यालगतही सध्या वस्त्या झाल्या आहेत. त्यामुळे हे प्राणी नाहीसे झाल्यासारखी परिस्थिती आहे. - अशोक घोरपडे, ग्रामस्थ, चचेगावबेंदरासाठी मातीचे बैल जोडीऔद्योगिकीकरण व जनावरे संगोपनावरील वाढता खर्च विचारत घेता शेतकरीही जनावरे पाळत नाहीत. बैलाच्या साह्याने होणारी मशागतीची कामे ट्रॅक्टर व नवनवीन यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यामुळे गावोगावी पाळीव प्राण्यांची संख्याही घटली आहे. परिणामी गाय-बैलांची दिवाळी म्हणून साजरी होणारी बेंदूर सणालाही सध्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबात मातीच्याच बैलांची पूजा केली जाते.
सिमेंटच्या जंगलात रानटी प्राण्यांचा बाजार
By admin | Updated: July 18, 2015 00:34 IST