सातारा : उद्योगांमध्ये वाढ झाल्यास शासनाचा महसूलतही वाढ होते. त्यामुळे शेतकरी व यंत्रमाग आदींना अनुदान देता येते. हे सर्व थांबविवण्याचे काम महावितरण कंपनी दरवाढीच्या माध्यमातून करत आहे. उद्योगधंदेच जगले नाहीत तर राज्याचा विकास कसा साधणार. महावितरणची अकार्यक्षमता, वीज गळती आणि वाढलेला भ्रष्टाचार यास कारणीभूत आहे.’ असा आरोप वीजग्राहक व औद्योगिक संघटनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे नियंत्रक प्रताप होगाडे यांनी केला. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ साताराच्यावतीने येथे औद्योगिक वीज दरवाढी संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘मास’चे माजी अध्यक्ष सुनील व्यवहारे, उद्योजक अजित मुथा, कूपर कार्पोरेशनचे नितीन देशपांडे, सुरेश पाटील आदींची उपस्थिती होती. होगाडे म्हणाले, महावितरण कंपनीने ३५ टक्के दरवाढीचा बोजा ठेवून उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडण्याचा घाट घातला आहे. सरकारने ७०६ कोटी रुपयांचे अतिरिक्त वीजदर अनुदान देण्याचे स्थगित केल्यानंतर डिसेंबर २०१४ या महिन्यात वीजग्राहकांना सरासरी २० टक्के वाढीव दराने वीज बिले देण्यात आली. एप्रिल अखेर अंदाजे १२ टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. तसे झाल्यास वीज ग्राहकांना ३२ ते ३५ टक्के दरवाढ लागू होऊ शकते. त्यामुळे याचा उद्योगधंद्यांवर परिणाम होवू शकतो. ‘मास’चे अध्यक्ष दिलीप उटकुर म्हणाले, ‘वीज दरवाढीसंदर्भात पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री, उर्जा मंत्री, अर्थमंत्री आदींसमावेत बैठकीचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, या संदर्भात दहा दिवसांत तोडगा न निघाल्यास २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली जाईल. यावेळी भरत शेठ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘मास’चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) ...अन्यथा उद्योग बंद आंदोलन वीज संकटामुळे रोजगारावर तसेच नव्याने येऊ घातलेल्या उद्योगांवर परिणाम होणार आहे. असे झाल्यास हे उद्योग अन्य राज्यांत स्थलांतरीत हाऊ शकतात. त्यामुळे वीज संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींपर्यंत आमच्या भावना पोहचविण्यात येतील. एवढे करुनही शासनाला जाग न आल्यास आंदोलनाच्या पुढील टप्प्यात एक दिवसीय उद्योग बंद, वीज बिलांची होळी अशा पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
वीजगळती, भ्रष्टाचाराचे काय?
By admin | Updated: January 14, 2015 23:52 IST