चाफळ : ‘गेली चौदा वर्षे पुनर्वसन प्रक्रियेच्या भोवऱ्यात अडकलेल्या उत्तरमांड प्रकल्पबाधित कडववाडी, माथणेवाडी, नाणेगाव बुद्रूक, गमेवाडी, चाफळ आदी गावांतील प्रकल्पग्रस्तांना देय असणाऱ्या जमिनी, गावठाणातील नागरी सोयीसुविधा आजही अपूर्ण असताना पाटबंधारेचे अधिकारी म्हणे धरणात शंभर टक्के पाणीसाठा करणार आहे. याला धरणग्रस्तांनी कडाडून विरोध केला असून, आमची थकीत देणी जोपर्यंत शासन देत नाही, तोपर्यंत धरणात शंभर टक्के पाणीसाठा करू नये, अन्यथा धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.
गमेवाडी येथे उत्तरमांड नदीवर नाणेगाव बुद्रूक, माथणेवाडी गावांच्या सरहद्दीवर उत्तरमांड धरण उभारण्यात आले आहे. तत्कालीन शिवसेना भाजपा युती शासनाच्या काळात मंजुरी मिळालेल्या या धरणाचे काम २०१० मध्ये पूर्ण झाले आहे. धरण उदयास येऊन तब्बल चौदा वर्षे पूर्ण झाली आहेत. या चौदा वर्षांच्या संघर्षात मात्र आजही उत्तरमांड धरणात बाधित ठरलेल्या अनेक खातेदारांना शासनाने जमिनी दिल्या नाहीत. पुनर्वसन केलेल्या गावठाणात आजही नागरी सुविधांचा वणवा पेटलेला आहे. गेली चौदा वर्षे शासन दरबारी हेलपाटे मारूनही प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशाच पडली आहे. असे असताना कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत येत असलेला लघुपाटबंधारे विभाग उत्तरमांड धरणात शंभर टक्के पाणीसाठा करणार म्हणत आहे. तसे पत्र संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना पाटबंधारे खात्याने पाठवलेली आहेत. यात उत्तरमांड धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांचे असलेले विद्युतपंप काढून घेण्याचे नमूद केले आहे. तर याला धरणग्रस्तांनी कडाडून विरोध केला आहे. ‘आमची थकीत देणी जोपर्यंत शासन देत नाही, तोपर्यंत धरणात शंभर टक्के पाणीसाठा करू नये तसेच पाणीसाठा केल्यास विद्युतपंप पाण्याखाली जाऊन निकामी होऊन शेतजमिनींना उन्हाळ्यात पाणी देता येणार नसल्याने पाणी अडवू नये,’ असे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे.
वर्षानुवर्षे शासनाने उत्तरमांड धरणग्रस्तांचे मुश्किल केलेले जगणे आणि ‘सरकार अन् प्रशासन’ नावाच्या यंत्रणेने केलेली दुर्दशा १४ वर्षांनंतरही संपली नाही. एका बाजूला पुनर्वसनाचा संघर्ष तर दुसरीकडे शेतीचे नुकसान होणार असल्याने प्रकल्पग्रस्त व्यथित झाले आहेत. त्यामुळे पाणी शंभर टक्के अडवू नये, असा पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे.
(चौकट)
शेवटी पदरी निराशाच
चाफळ विभागातील उत्तरमांड धरणग्रस्तांना कोणी वाली उरला नाही. या धरणग्रस्तांचे नेतृत्व करण्यास कोणीही नाही. त्यामुळे धरणग्रस्त स्वत: यासाठी ताठ मानेने लढा देताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधी व धरणग्रस्त संघटनेने पाठ फिरवल्याने धरणग्रस्त एकटे पडले आहेत. प्रकल्पासाठी धरणग्रस्तांनी जमिनीसह घरादाराचा त्याग करूनही शेवटी पदरी निराशाच पडली आहे.
(कोट..)
धरण पूर्ण झाले आहे. मात्र विभागात कोणतीच पाणी योजना कार्यान्वित नाही. त्यामुळे स्वखर्चाने पदरमोड करून कर्ज काढून अनेक शेतकऱ्यांनी पाईपलाईन करत शेत जमिनीस पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पाडळोशी-दाढोली खोऱ्यातील शेतजमिनींना या धरणाचे पाणी मिळेना, अशी अवस्था आहे. शेतकरी संघटनेने धरणग्रस्तांची पाठराखण करत शासनाकडे थकीत देणी देण्याबाबत प्रयत्न करावेत.
- नितीन मसुगडे, सरपंच, नाणेगाव बुद्रूक