लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आंतरजिल्हा बदली झालेल्या १२३ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनातून शाळा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात नवीन आलेल्या या शिक्षकांना गटशिक्षणाधिका-यांसह उपस्थितांनी भौगोलिक माहिती देऊन त्यांच्या सोयीची शाळा निवडण्यास साहाय्य केलं, हे विशेष.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समुपदेशनातून बदल्यांसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात २८७ जागा रिक्त असतानाही केवळ १२४ जागा पदस्थापनेसाठी दाखवण्यात आल्या आहेत. कोरेगाव, वाई, खंडाळा तालुक्यांत एकही जागा दाखविण्यात आली नव्हती. गेल्या आठ दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी आलेल्या शिक्षकांची नेमणूक केली जाणार होती. मात्र, अचानक पदस्थापनेची तारीख पुढे गेल्याने या प्रक्रियाबाबत शिक्षकांच्या मनात गोंधळ होता.
जिल्हा परिषदेत समुपदेशनाची प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू झाली. पात्र महिला शिक्षकांना आधी निवडीसाठी बोलविण्यात आले. परजिल्ह्यातून आलेल्या या शिक्षकांना उपलब्ध शाळेची भौगोलिक रचना सांगण्याचे काम गटशिक्षणाधिकारी यांनी केले. शिक्षिकांना शाळा दिल्यानंतर शिक्षकांसमोर पर्याय ठेवण्यात आले. शिक्षकांच्या अपेक्षा विचारून त्यानुसार त्यांना शाळा देण्यात आल्या. विशेष म्हणजे शिक्षकांशिवाय अन्य कोणालाही या प्रक्रियेत समाविष्ट करून घेतले गेले नाही. त्यामुळे शिक्षकांबरोबर आलेले नातेवाईक आणि मित्रमंडळींना बाहेरच थांबावे लागले.
गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षक दररोज जिल्हा परिषदेत हजेरीसाठी येत असून त्यांना अजूनही वेतनापासून वंचित राहावे लागत होते. या प्रक्रियेमुळे त्यांचे विद्यार्थ्यांना अध्यापनही सुरू होऊन आर्थिक बोजाही कमी होण्यास मदत होणार आहे.
चौकट :
मित्रांना मिळाची एकच शाळा
समुपदेशन बदली प्रक्रियेसाठी दाखल झालेल्या शिक्षकांमध्ये दोन चांगल्या मित्रांचाही समावेश होता. सातारा जिल्ह्याची भौगोलिक माहिती सांगितली जात असताना त्या दोघांनीही आम्ही चांगले मित्र आहोत. आम्हाला एकत्र राहायला खोली घ्यायची आहे. त्यामुळे दोघांनाही सोपी होईल, अशा शाळा सुचवा, असं उपस्थितांना सांगितलं. यावर कोयनानगर भागात दोन पदे रिक्त असलेली शाळा आहे, तुमची इच्छा असेल दोघं एकत्र राहाही आणि कामही करा’ असं सुचविण्यात आलं. ही शाळा नकाशावर कुठे आहे बघण्यापूर्वीच या शिक्षकांनी ही शाळा पसंत असल्याचं कळवलं. या दोन शिक्षक मित्रांना एकाच शाळेवर शिकविण्याची संधी मिळाली.