सातारा : चिंचणेर वंदन येथे करण्यात आलेले शौचालय अनुदान वाटप आणि त्यावर करण्यात आलेला खर्च संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. यासंदर्भात सातारा पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी एस. बी. जाधव यांनी चौकशी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, या अनुषंगाने ग्रामसेवक बी. डी. स्वामी यांना म्हणणे मांडण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी ते सादर केलेले नाही. याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे २००९-१० मध्ये देण्यात आलेल्या शौचालय अनुदान वाटपात अपहार झाल्याची तक्रार जिल्हा परिषद आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे झाली होती. हिंदुराव नारायण बर्गे त्याचबरोबर भारती कदम आणि मंगल साळुंखे हे तक्रारदार होते. या तक्रारीनंतर सातारा तालुका आणि चिंचणेर वंदन परिसरात एकच खळबळ उडाली होती. तत्कालीन सरपंच दत्तात्रय रावसाहेब बर्गे आणि ग्रामसेवक बी. डी. स्वामी यांनी बोगस पावत्या बनवून त्यावर बोगस सह्या करून अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीनंतर सातारा पंचायत समितीच्या तत्कालीन विस्तार अधिकारी एस. बी. जाधव यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आपला चौकशी अहवाल सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. मात्र, त्याबाबत अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.विस्तार अधिकारी जाधव यांनी दिलेल्या चौकशी अहवालात म्हटले आहे की, चिंचणेर वंदन ग्रामपंचायतीचे दि. २ मे २००९ चे कॅशबुक पाहता प्रमाणक क्रमांक ३ ते २५ वर भारती रमेश कदम व इतर वीस जणांना २२०० रुपये शौचालय अनुदान दाखविण्यात आले आहे. याची प्रमाणके उपलब्ध असून, त्यावर दारिद्र्यरेषेखालील शौचालय अनुदान रक्कम २२०० रुपये असे मिळाल्याचे म्हटले आहे. त्यावरही सहीदेखील आहे. यानंतर दि. ६ जून रोजी संबंधित २२ लाभार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर त्यापैकी १३ लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले आणि त्यांचे जबाब घेण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत दप्तरी असलेले प्रमाणक आणि जबाबावरील सही याबाबत काही विसंगती आढळून आल्या आहेत. कॅशबुकवर प्रमाणक ३ ते २४ वर शौचालय अनुदान खर्च २२०० रुपये दाखविण्यात आला आहे. प्रमाणक क्रमांक २५ अशोक केशव जाधव यांना १२०० रुपये अनुदान खर्च दाखविण्यात आला असून, दप्तरी नोंद मात्र २२०० रुपये आहे.चौकशीवेळी हजर असणाऱ्या १३ लाभार्थ्यांनी शौचालयासाठी आलेले अनुदान आम्हाला मिळाले नाही. बोगस पावती आणि बोगस सह्या करून ते हडप केल्याचा आरोपही संबंधित लाभार्थ्यांनी केला आहे. यानंतर ग्रामसेवक बी. डी. स्वामी यांना त्यांचे म्हणणे देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी अजूनही त्यांचे म्हणणे सादर केलेले नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे.शौचालय अनुदानाच्या प्रमाणकावरील सही व जबाबावरील सही यात विसंगती दिसून येते. त्यामुळे शौचालय अनुदानावर झालेला खर्च ४९ हजार ६०० रुपये खर्च संशयास्पद केल्याचे दिसून येत असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)ग्रामसेवक बी. डी. स्वामी यांना खुलासा देण्याबाबत सातारा पंचायत समितीने दि. १६ जुलै रोजी नोटीस बजावली आहे. मात्र, त्यांना आता अंतिम नोटीस देऊन त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
शौचालय अनुदान वाटपात घोटाळा
By admin | Updated: August 18, 2014 23:34 IST