चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात दिवस रात्र पडलेल्या मुसळधार पावसाने, अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले. अनेकांच्या घरात पाणी शिरले, घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. शिंगणवाडी येथे रस्त्याकडेला बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा भराव वाहून गेल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. चाफळ येथील फरशी पुलाचे साहित्य उत्तरमांड नदीला आलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे वाहून गेले. शेतात पाणी शिरून पिके वाहून गेल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे.
चाफळसह परिसरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक काही क्षणातच ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या, तर शिंगणवाडी येथे रस्त्याकडेला बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा भराव वाहून गेल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. चाफळ येथे उभारण्यात येत असलेल्या फरशी पुलाचे साहित्य उत्तरमांड नदीला आलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे वाहून गेले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने अनेकांच्या घरात रस्त्यांवरील पाण्याचा प्रवाह घुसला. अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती.
चाफळ येथील इस्माईल काझी यांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या घराची भिंत कोसळली आहे. तावरेवाडी येथील डोंगर खचला. पाडळोशी गावच्या परिसरातील भाताचे तरवे वाहून गेले. पाडळोशी जवळील मसुगडेवाडी येथील फरशी पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. उत्तरमांड नदीला आलेल्या पुरामुळे पोपट साळुंखे व मिलिंद साळुंखे यांच्या घरात पुराचे पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. शकील मुल्ला यांच्या दुकानात पाणी शिरल्याने सिमेंट पोत्यासह इतर साहित्य भिजून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीतच जोरदार पावसाने विभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट :
उभे पीक वाहून गेले
विभागातील डेरवण येथे नव्याने बांधण्यात आलेल्या वळण बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. भराव वाहिल्याने मधुकर सोनावले, पतंगराव सोनावले, संपत सोनावले, दादासाहेब सोनावले, अरुण सोनावले, नीलेश सोनावले, बबन सोनावले, सुनीता सोनावले यांच्या शेतात पाणी शिरल्याने पेरण केलेले पीक वाहून गेले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी डेरवणच्या सरपंच आशाताई यादव यांनी केली आहे.
फोटो १९चाफळ
चाफळ विभागात दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. (छाया : हणमंत यादव)