अस्ताव्यस्त पार्किंग
सातारा : शहरातील बसस्थानक परिसरामध्ये अस्ताव्यस्त वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोेंडी निर्माण होत आहे. या ठिकाणी रिक्षा चालकांकडून रिक्षा थांबविल्या जात असून, परिणामी मुख्य चौकात वाहतूक कोंडी होत आहे. सकाळ व सायंकाळच्या वेळेस चौकात वाहतूक कोंडी होत असते.
वळणामुळे त्रास
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याला छेद देऊन वळणांनी प्रवास करावा लागत आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना वारंवार येणाऱ्या या वळणांचा त्रास होऊ लागला आहे.
गटारात प्लास्टिक कचरा
सातारा : येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जात आहे. त्यामुळे गटारी तुंबून त्यातील कचरा रस्त्यावर येत आहे. पावसाळ्यात यामुळे पाणी घरांमध्ये जाण्याचा धोका वाढला आहे.
वर्दळीला हवी वेगमर्यादा
सातारा : कास रस्त्यावर विविध ठिकाणी लहान-मोठे वन्यजीव वाहतुकीचे बळी ठरत आहेत. प्राणिजीवन रात्री सुरू होत असल्यामुळे पश्चिमेकडून येणाऱ्या घाटरस्त्यांवरील वाहतुकीला रात्रीच्यावेळी वेगमर्यादा ठरवून देणे आवश्यक बनले असून, वनखात्याने त्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
डुकरांचा नाहक त्रास
सातारा : शहरातून वाहणाऱ्या ओढ्यांमधून डुकरांची संख्या भरमसाठ वाढली आहे. ओढ्याजवळील रस्त्यांवर ही डुकरे मोकाट फिरत असतात. रहदारीला धोका निर्माण झाल्याने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
.........