उंब्रज : एकतर्फी प्रेमातून युवकाकडून वारंवार त्रास दिला जात असल्याने निराश झालेल्या युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ऊरूल (ता. पाटण) येथे आज, शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.भाग्यश्री बबन दाभाडे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय अशोक वायदंडे (रा. कवठे, ता. कऱ्हाड) याच्यावर उंब्रज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत भाग्यश्रीचे वडील बबन दिनकर दाभाडे यांनी याबाबतची फिर्याद उंब्रज पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊरूल येथील भाग्यश्री दाभाडे ही युवती पाटणच्या डी. एड. महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ऊरूलहून पाटणला तिचे दररोज येणे-जाणे होते. अक्षय वायदंडे हा नातेवाईक असलेला युवक भाग्यश्रीला त्रास देत होता. गत काही दिवसांपासून भाग्यश्रीची कऱ्हाडला परीक्षा सुरू होती. त्यामुळे वडील बबन दाभाडे हे दररोज तिला कऱ्हाडला सोडण्यासाठी व परत नेण्यासाठी येत होते. मंगळवारी (दि. १७) प्रकृती ठीक नसल्यामुळे वडिलांऐवजी भाग्यश्रीसोबत तिची बहीण जयश्री कऱ्हाडला आली होती. पेपर सुटल्यानंतर दोघी बसस्थानकाकडे निघाल्या असताना अक्षयने वाटेत त्यांना अडविले. भाग्यश्रीला दुचाकीवर घेऊन तो तेथून निघून गेला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याने तिला बसस्थानकात सोडले. घरी आल्यानंतर जयश्री व भाग्यश्री यांनी हा प्रकार वडिलांना सांगितला. तसेच अक्षयने मारहाण केल्याचेही भाग्यश्रीने वडिलांना त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर रात्री घरात कोणास काहीही न सांगता भाग्यश्री निघून गेली. शोध घेऊनही ती न सापडल्याने नातेवाइकांनी भाग्यश्री बेपत्ता असल्याबाबतची तक्रार उंब्रज पोलिसांत दिली. पोलीस व नातेवाईक भाग्यश्रीचा शोध घेत असताना आज सकाळी ऊरूल येथील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत बबन दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अक्षय वायदंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
By admin | Updated: June 22, 2014 00:17 IST