नागठाणे : ‘विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य महाविद्यालय करते. परंतु विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवायचे असेल, तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि परिश्रम आदी गुणांबरोबरच विद्यार्थ्यांनी शिस्त, आदर, हुशारी, दूरदृष्टी, कार्यक्षमपणा आणि जबाबदारी या गुणांचा अंगिकार केल्यास आयुष्यात कधीही पाठीमागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही. हे गुण आत्मसात करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचा ध्यास असला पाहिजे,’ असे प्रतिपादन नागठाणेच्या सरपंच डाॅ. रूपाली बेंद्रे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्टस् ॲड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
बेंद्रे म्हणाल्या, ‘जो विद्यार्थी ‘विद्या हेच धन’ समजून जो विद्येची कमाई करतो, तोच खरा विद्यार्थी. तसेच अनेक युगपुरुषांनी आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपणास शिक्षणाची दारे खुली करून दिली आहेत. मात्र शिक्षणातून आपणास काय साध्य करायचे आहे, हे निश्चित करणे आवश्यक आहे.’
मनोहर साळुंखे म्हणाले, ‘नागठाणे महाविद्यालय हे स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकास साधून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावे.’
प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे बँकेत ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृती वाढवून अविरत प्रयत्नाने यश संपादित करावे.’
सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एस. के आतार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जयमाला उथळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजितकुमार जाधव यांनी प्रमाणपत्राचे वाचन केले. डॉ. सुरेश पाटील यांनी आभार मानले.
प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. सरपंच, उपसरपंच तसेच मनोहर साळुंखे यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच अनिल साळुंखे, विद्यार्थी -विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.