सातारा : सातारा जिल्हा हा दुर्गम, दऱ्या-खोऱ्यांचा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या डोंगरामुळे या ठिकाणाहून पावसाळा, हिवाळ्यात प्रवास करताना डोळ्यांचे पारणे फिटते. पाचगणी, महाबळेश्वर, कास परिसरात तर दाट धुक्यात, ढगापासून प्रवास करताना जणू आपण स्वप्नातच प्रवास करत असल्याचा भास होतो. विजेवरील एसटीतून प्रवास करण्याचे सातारकरांचे स्वप्न मात्र घाटरस्त्यामुळे हवेतच विरणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ बदलत्या काळानुसार नवनवीन बदल करत असतात. कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ कधी नव्हे ती मालवाहतुकीकडे वळले. त्याचप्रमाणे सातत्याने डिझेलचे दर वाढत असल्याने प्रवासी वाहतुकीवरही मोठा खर्च होत असतो. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात विजेवर चालणाऱ्या गाड्या आणल्या आहेत. त्यामुळे मोठी बचत होणार असली तरी, सातारा विभाग मात्र याला आणखी काही वर्षे तरी अपवादच ठरणार आहे.
सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाट, जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास, बामणोली ही पर्यटनस्थळे सह्याद्रीच्या डोंगरात असल्याने विजेवर चालणाऱ्या गाड्या कितपत साथ देणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे सध्या तरी सपाट मार्ग असलेल्या ठिकाणीच गाड्या चालविण्याचा एसटी महामंडळाचा संकल्प आहे. त्यामुळे सातारकरांना काही दिवस थांबावे लागणार आहे.
चौकट
या मार्गावर येणार अडचणी
सातारा जिल्ह्यातून गेलेल्या सह्याद्री घाटमाथ्यामुळे अनेक मार्गावर इलेक्ट्रिक गाड्या जातील का, याची खात्री नाही. त्यामुळे खंबाटकी घाटामुळे सातारा-पुणे, यवतेश्वर घाटांमुळे कास, बामणोली, पसरणी घाटांमुळे पाचगणी, महाबळेश्वर या मार्गावर विद्युत एसटी धावणे अवघड आहे.
चौकट
आणखी काही वर्षे तरी प्रतीक्षाच
राज्य परिवहन महामंडळाने सध्या सपाट रस्ता असलेल्या विभागांमध्ये विजेवर चालणाऱ्या गाड्या प्रायोगिक तत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सांगली-कोल्हापूर, सांगली-सोलापूर अशा मार्गांचा समावेश असणार आहे.
राज्यातील इतर विभागांमध्ये अशा गाड्यांना कसा प्रतिसाद मिळतो. एकदा चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर धावतात. म्हणजे एसटी भरलेली असताना किती किलोमीटर धावतात, त्यावर होणारा खर्च याचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्यानंतर साताऱ्याचा विचार होऊ शकतो.
चौकट
...तरीही चार्जिंग पॉईंटची गरज
एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या गाड्या खासगी असणार आहेत. त्यामुळे भविष्यात या गाड्यांना मागणी वाढू शकते. तसेच कोल्हापूर, बारामती या दिशेने येताना फारसा घाट नाही. त्यामुळे बाहेरच्या विभागातूनही काही गाड्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी चार्जिंग पॉईंट केल्यास फायदा होऊ शकतो.
जिल्ह्यातील अनेक नागरिक स्वत:च्या वापरासाठी विजेवर चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी गाड्या घेत आहेत. एसटी महामंडळाने चार्जिंग पॉईंट तयार केल्यास खासगी वाहनधारकांना एकप्रकारे सोय होऊ शकते. त्यातून एसटीलाही उत्पन्नवाढीचा नवा स्त्रोत सुरू होऊ शकतो.
चौकट
पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे
सातारा जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथे विपुल वनौषधी उगवतात. कास पुष्पपठारावर जगात कोठेही उगवत नाहीत, अशी दुर्मिळ फुले येथे उगवतात. त्यामुळे डिझेलमुळे धूर ओकणाऱ्या गाड्या पर्यावरणावर घाला घालत असतात. त्यामुळे अशाप्रकारच्या गाड्या रस्त्यावर आल्यास धूर कमी झाल्यामुळे पर्यावरणाचे रक्षणच होणार आहे. घाट रस्ते हे किरकोळ अडथळे आहेत. राज्यात इतर ठिकाणी वापर केल्यानंतर तंत्रज्ञानात बदल करून क्षमता वाढविली जाऊ शकते.
कोट
घाटरस्त्याचा अडथळा
राज्य परिवहन महामंडळाने विजेवर चालणाऱ्या गाड्या आणण्याचा विचार केला आहे. मात्र सातारा जिल्ह्यात असलेल्या घाटरस्त्यांवर त्या कितपत चालतील, हा प्रश्न असल्याने सध्या तरी या अनोख्या प्रयोगाला घाटरस्त्याचा अडथळा आहे. तो लवकरच दूरही होऊ शकतो.
- सागर पळसुले,
विभाग नियंत्रक, सातारा.