कऱ्हाड : बेडसाठी धावाधाव, ऑक्सिजनची मारामार, त्यातच रेमडेसिविरचा तुटवडा. एकीकडे रुग्णांची तडफड, तर दुसरीकडे नातेवाईकांची घालमेल. रुग्णालयांनी हात वर केलेले, तर दुसरीकडे प्रशासनाचेही हात बांधलेले. ‘आभाळंच फाटलं, तर ठिगळ कुठं लावणार’, हा प्रशासनाला पडलेला प्रश्न. जेव्हा वेळ होती तेव्हा जनता मस्त आणि प्रशासन सुस्त होतं. त्यामुळेच सध्याची ही बिकट परिस्थिती ओढवली.
बैल गेला झोपा केला, असं म्हटलं जातं. कोरोना संसर्गात प्रशासनाचंही असंच झालं. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात संसर्ग घटला. रुग्णसंख्या कमी झाली; पण कोरोनाच संपला, असं समजून सर्वकाही पूर्ववत सुरू झाले. बाजारपेठ फुलली. रस्ते गजबजले. गर्दीची ठिकाणे ओसंडून वाहिली. अखेर फेब्रुवारी महिन्यात भ्रमाचा भोपळा फुटला. कोरोनाचा संसर्ग वाढला. जनता धास्तावली. सुस्तावलेलं प्रशासन खडबडून जागं झालं. मात्र, जाग येऊनही वेळ निघून गेलेली. त्यामुळे प्रशासनाच्या हाती काहीच राहिलं नाही.
गतवर्षी सप्टेबर महिन्यात कऱ्हाड तालुक्यामध्ये ४ हजार ३९५ बाधित आढळले होते. यावर्षीच्या एप्रिल महिन्यातच हा आकडा मागे पडला. तब्बल ५ हजार २७२ ने रुग्णवाढ झाली. त्यामुळे पहिले पाढे पंचावन्न, अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. एप्रिलपूर्वीच रुग्णालये फुल्ल झाली. बेड कमी अन् रुग्ण जास्त. त्यामुळे रुग्णालयांनीही हात वर केले. बेडसाठी धावाधाव सुरू झाली. ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेंटिलेटरअभावी रुग्ण तडफडले. काहींनी वाहनात, काहींनी घरात, तर काहींनी रुग्णालयाच्या दारातच अखेरचा श्वास घेतला. गत महिनाभरापासून कऱ्हाडात ही हृदयद्रावक परिस्थिती पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेत निर्माण झालेली परिस्थिती ओळखून प्रशासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या चार महिन्यात आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही आणि एप्रिल महिन्यात परिस्थिती वाईटाहून वाईट बनली.
- चौकट
का वाढले रुग्ण..?
१) संसर्ग घटताच प्रशासनाने केलेले दुर्लक्ष
२) मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
३) प्रवाशांना ‘क्वारंटाईन’ करण्याचा विसर
४) बाधितांच्या जवळून सहवासीतांचा बिनधास्त वावर
५) ‘होम आयसोलेट’ रुग्णांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
६) गावोगावी सर्व्हे करण्यास अनुत्सुकता
७) ग्रामपंचायतींचे बेजबाबदार धोरण