सातारा : कामगार कायद्यात सुरू असलेले बदल थांबविण्यात यावेत तसेच सरकारी धोरणाचे खासगीकरण थांबविण्याची मागणी करत भारतीय ट्रेड युनियन केंद्र आणि आयटक संघटनेच्या सातारा जिल्हा शाखेने केंद्र आणि राज्य शासनावर हल्लाबोल केला. शुक्रवारी या दोन्ही संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यामध्ये सहभागी झाल्या होत्या.सीटूच्या नेतृत्वाखाली सर्व अंगणवाडी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले तर आयटकच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा राजपथमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी दोन्ही संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. सीटू आणि आयटकच्या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कर्मचारी, घरेलू कामगार, बीएसएनल कंत्राटी कामगार, औषध विक्रेते, एलआयसी, बांधकाम, मजूर, रोजगार सेवक, अखिल भारतीय किसान सभा या निदर्शनात सहभागी झाले होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारमध्ये सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सरकारी मालकीच्या कंपन्या देशी तसेच परदेशी कंपन्यांना कवडीमोल दराने विकल्या आहेत. परिणामी सामान्य जनेच्या सेवा महाग झाल्या आहेत. बड्या कंपन्यांची सोय म्हणून कामगार कायद्यात बदल केले आहेत. कामगार हितांच्या ‘अच्छे दिन’चा मोदी सरकारला मात्र विसर पडला आहे. म्हणून सरकारला वठणीवर आणण्यासाठी देशातील प्रमुख ११ कामगार संघटना मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशव्यापी लढत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दि. ५ डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरलो आहे.कॉ. आनंदी अवघडे, प्रतीभा भोसले, मालन गुरव, अनिता चव्हाण, सुनीता धुमाळ, सुनीता चांगण, कॉ. कल्याणी मराठे, साधना गंधाले, कॉ. माणिक अवघडे, महेश नलावडे, कॉ. दत्ता राऊत, नज्बा बागवान, कॉ. संजय सावंत, कॉ. शामराव बुधवाले, कॉ. संजय शिंदे, कॉ. प्रकाश जंगत, कॉ. मिलींद मनोहर, शौकतभाई पठाण आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सेविका, मदतनीस झाल्या आक्रमक
By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST