वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडीतील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाचे अभियंता राजेश शिंगाडे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी आप्पासाहेब मिसाळ व अर्जुन यादव, कार्याध्यक्षपदी डॉ. सतीश जगताप तर सचिवपदी अनिकेत आटपाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली व विजयराज पिसे, माजी अध्यक्ष कांतीलाल आटपाडकर, सुनील थोरात, माजी सरपंच विजयकुमार जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाईन बैठकीत या निवडी करण्यात आल्या. या बैठकीत मागील पाच वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा घेण्यात आला व संघटनेच्या कार्याची पुढील दिशाही ठरविण्यात आली.
संघटनेच्या माध्यमातून माण तालुक्यात आजपर्यंत अनेक विधायक कामे केली असून, परिसरातील सामाजिक स्तरावरील कामे करण्यासाठी अनेकांना या संघटनेच्या माध्यमातून प्रेरणा देण्यात आली आहे. त्याबरोबरच आपत्ती निवारण करणे, समाजातील मागास घटकांचा सर्वांगिण विकास साधणे, गावकुसातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच ही संस्था अग्रेसर राहणार असल्याचे राजेश शिंगाडे यांनी सांगितले.