कऱ्हाड : तोंडातून बाहेर पडलेला शब्द अन् धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही, असं म्हणतात; पण कऱ्हाड दक्षिणेतील शिवसैनिकांना हा सुटलेला बाण परत पाहिजे म्हणे़ गतवेळी पुनर्रचनेत भाजपकडे गेलेला मतदारसंघ त्यांना परत हवाय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवधनुष्य पेलायचंय आणि त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरलाय म्हणे ! राज्यात १९९१ पासून शिवसेना-भाजपची युती आहे़ त्यावेळीपासून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहे़ येथून चंद्रकांत पवार, अशोक भावके अन् मुंबईस्थित कमलाकर सुभेदार यांनी ‘भगवा’ झेंडा खांद्यावर घेऊन येथून सेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविली़ कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा तर आजवर काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. दिवंगत यशवंतराव मोहिते आणि त्यानंतर विलासराव पाटील-उंडाळकर हे दोनच आमदार या मतदारसंघाने पहिलेत; पण या बालेकिल्ल्यात शिवसेनेने आपल्या भगव्या वादळाचं अस्तित्व दाखविण्याचा चांगलाच प्रयत्न केला़ खरंतर तालुक्यातील कऱ्हाड व मलकापुरात सेनेची बांधणी तशी बरी होती व आहे. पण, ही दोन्ही शहरं उत्तरेत. त्यामुळे भाजपाकडे असणारा उत्तर मतदारसंघ सेनेला मिळावा, अशी सैनिकांची अपेक्षा. पक्षश्रेष्ठीेंनी ही अपेक्षा पूर्ण केली खरी; पण तेव्हा ही दोन्ही शहरं कऱ्हाड दक्षिणेत समाविष्ट झालेली. त्यामुळे गत निवडणुकीत शिवसैनिकांनी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करत कमळ हातात धरलं़, तर उत्तरेत वासुदेवांची स्वारी शिवधनुष्य पेलायला उभी केली; पण आता दक्षिणेतील शिवसैनिकांना कमळाचा भार पेलवेना झालाय. त्यांना हातातून सुटलेला कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ पुन्हा सेनेकडे हवाय़ लोकसभा निवडणुकीत सेनेच्या बंडखोर पुरुषोत्तम जाधवांच्या किटलीत दक्षिणेत चांगली वाफ भरल्याने शिवसैनिकांच्या प्रेशर कुकरची शिट्टी वाजू लागली आहे़ कऱ्हाड व मलकापूर शहरांत जाधवांनी घेतलेल्या आघाडीची हवा त्यांच्या डोक्यात शिरली असून, दक्षिणेचं शिवधनुष्य आम्हीच पेलू शकतो, अशी धारणा त्यांच्यात निर्माण झालेली दिसतेय़ भाजपच्या भरत पाटलांनी लढण्याची तयारी यापूर्वीच केली आहे़ स्वाभिमानीचे पंजाबराव पाटील इथून दावा करत आहेतच; पण शिवसैनिकांची मतदारसंघ परत मागण्याची तयारी नेमकी कोणासाठी ? हे लक्षात येत नाही़ सेनेकडे नितीन काशीद, प्रमोद तोडकर, शशिकांत हापसे असे अनेक लढवय्ये कार्यकर्ते आहेत. पण विधानसभा निवडणुकीवर स्वार होईल, असे नाव आजतरी दिसत नाही़ मग त्यांची ही मागणी नवा विक्रम कसा करणार की कोणी नवा ‘विक्रम’ शोधणार ? हा संशोधनाचा विषय बनला आहे. पण सध्या तरी शिवसैनिक म्हणताहेत, ‘दक्षिणचा सुटलेला बाण परत द्या़’ (प्रतिनिधी) मुंबईत तळ शिवसेनेने जिल्ह्याला नवे ‘कारभारी’ नुकतेच दिले आहेत़ त्यामुळे जुन्या कारभाऱ्यांची गोची झालीय खरी; पण हे नवे कारभारी सध्या काही निवडक सैनिकांना घेऊन मुंबईत तळ ठोकून आहेत़ त्यात कऱ्हाड दक्षिणचे सैनिकही आहेत़ महायुतीमधील नेत्यांची जागा वाटपाची चर्चा सध्या इथंच सुरू आहे़ तेथे नेत्यांसमोर दक्षिणची परिस्थिती मांडून काही पदरात पडतंय का ? याचा प्रयत्न सुरू आहे़ बघूया त्यांची दखल कोण घेतंय का ते !
म्हणे... सुटलेला बाण परत द्या ! पक्षश्रेष्ठींकडे आग्रह
By admin | Updated: August 1, 2014 23:59 IST