श्रावण महिन्यात दहीहंडीचा सोहळा साजरा करण्यात येतो. पण, दोन वर्षात कोरोना विषाणूच्या संकटामुळे या दहीहंडीवर निर्बंध आले आहेत. तरीही दहीहंडीचा उत्साह गोविंदा पथकात कायम असतो. सातारा जिल्ह्याचा विचार करता सातारा शहराबरोबरच ग्रामीण भागातही काही गोविंदा पथके आहेत. ही पथके दहीहंडी फोडून बक्षीस मिळवण्याच्या उद्देशानेच कार्यरत असतात. काही पथके तर जिल्ह्याबरोबरच बाहेरील ठिकाणीही जाऊन दहीहंडी फोडून बक्षिसे पटकवतात. पण, दहीहंडी फोडणे व बक्षीस मिळविणे सोपे काम नाही. यासाठी गोविंदाच्या अंगी धाडस लागते. त्याचबरोबर सराव आणि कौशल्यही महत्त्वाचे ठरते.
दहीहंडीच्या पूर्वी काही दिवस गोविंदा पथक तयारीला लागते. खाली कोण उभे राह्याचे. मध्यावर कोण, किती थरापर्यंत तयारी करायची, कोणाला सामील करून घ्यायचे व सर्वात वर कोण जाऊन हंडी फोडणार याचा विचार करून तयारी करण्यात येते. या पथकांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच नोकरी, व्यवसाय करणारे तरुणही असतात. यामुळे रात्रीच्यावेळीही सराव केला जातो. उंच थर रचले जातात. त्यानंतर काही दिवसांच्या सरावानंतर गोविंदा पथके सज्ज होतात.
जेवढी दहीहंडी उंच, तेवढाच थरार अधिक असतो. उंच दहीहंडी पाहण्यासाठी शौकिनांचा वेढाही तेवढाच असतो. गोविंदांचे धाडस, कौशल्य यावेळी अनुभवास मिळते. कारण, दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोविंदाच्या अंगावर पाण्याचे फवारे उडविले जातात. त्यातच खालील माती निसरडी होते. कपडे ओलेचिंब होतात. अशावेळी सर्वात खाली उभे राहणाऱ्यांचा खरा कस लागतो. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा अशा थरापर्यंत मनोरा चढवला जातो. हे थर लावताना वर जाणाऱ्यांना पाय कोठे ठेवायचा, कोठे धरायचे याचे प्रशिक्षण मिळालेले असते. यामधील कोणी गोविंदा डगमगलाच तर गोविंदाचे सर्व थर खाली कोसळतात. त्यामुळे पाय घट्ट ठेवूनच थर रचावे लागतात. तेव्हा कोठे दहीहंडी फुटली जाते. पण, यासाठी कौशल्य, सराव, धाडस महत्त्वाचे ठरते हे नक्की.
चौकट :
जवळवाडीचे गोविंदा पथक...
आभाळाशी स्पर्धा करण्याचे साहस जिद्द, चिकाटी आणि एकजुटीने सात थर रचणारा सातारा जिल्ह्यातील अनेक बक्षिसांचा मानकरी ठरलेला अजिंक्य संघ म्हणजेच जावळी तालुक्यातील जवळवाडीचे भैरवनाथ गोविंदा पथक. जवळवाडीतील या गोविंदा पथकाने इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर या शहरांमध्ये जाऊन अनेक दहीहंड्या फोडण्याचा मान मिळवला आहे.
कोट :
भैरवनाथ गोविंदा पथकाने एक आव्हान म्हणून सातत्याने पाच वर्षे आपला गोविंदा पथकाचा विजयाचा सिलसिला सुरू ठेवला. उत्तरोत्तर आयोजक कमी होत गेले. त्यानंतर आलेला कोरोनाचा काळ पाहता हा साहसी खेळ थांबला. खरेतर शासनाने अशा या गोविंदा पथकांना, मराठमोळ्या सण-उत्सवांना मोठ्या प्रमाणात मदत करायला हवी. तरच हे साहसी खेळ टिकतील.
- रामदास सुरेश जवळ
भैरवनाथ गोविंदा पथक, जवळवाडी.
फोटो दि.२७ सातारा दहीहंडी गोविंदा फोटो (मेल)
......................................................................