सचिन काकडे - सातारा - दूध हा नाशवंत पदार्थ आहे. त्यापासून बनविला जाणार खवा आणि खव्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांवर हवामानाचा परिणाम होतो. अतिउष्ण तापमानाचा या पदार्थांवर परिणाम होत असला तरी साताऱ्याचे हवामान खव्यासाठी पोषक आहे. येथील वातावरणात खवा अथवा त्या पासून बनविण्यात येणारे पदार्थ महिनाभर टिकू शकतात. त्यामुळे सातारची हवा खव्याला पोषक आहे, असेच म्हणावे लागेल.खव्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांना सण-समारंभात मोठी मागणी असते. गणेशोत्सव जवळ आल्याने सध्या मिठाईच्या दुकानात खव्यापासून विविध पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. सातारा शहरात मिठाईची जवळपास ६० ते ७० दुकाने आहेत. या दुकानांमध्ये विविध प्रकारची मिठाई विक्रीस उपलब्ध असली तरी खव्यापासून बनविण्यात येणाऱ्या जगप्रसिद्ध ‘कंदी’ पेढ्यालाच ग्राहकांची पहिली पंसती मिळत आहे. कंदी पेढ्यामुळेच शहराला एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कंदी पेढ्याची विदेशात निर्यात केली जाते.कऱ्हाडच्या कृष्णाकाठी तयार होणारा खवा हा उच्चपतीचा असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खव्याला काही प्रदेशात मावा असेही म्हटले जाते. एक लीटर दुधापासून साधारणत: १२० ते १३० ग्रॅम खवा बनतो. खवा प्रतिकिलो २६० ते ३०० रुपये किलोने विकला जातो. जिल्ह्यात साताऱ्यासह, कोल्हापूर, पुणे या ठिकाणांहून देखील खव्याची आवक होते. (प्रतिनिधी)‘कंदी’चा इतिहासखव्यापासून बनविण्यात येणाऱ्या साताऱ्याचा कंदी पेढ्याने शहराला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. या पेढ्याला ‘कंदी’ असे नाव का पडले? याचा इतिहास देखील तितकाच गमतीदार आहे. ब्रिटिश राजवटीत साताऱ्यात गायी, म्हशींची संख्या खूप प्रमाणात होती. त्यामुळे दूधदेखील मुबलक होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी काही लोकं मोठ्या कडईमध्ये दूध घट्ट होईपर्यंत उकळत असत. यानंतर त्या मिश्रणात गूळ अथवा साखर टाकली जायची. दुधाचे घट्ट गोळे तयार करून ते एका करंडीमध्ये भरले जात. मग दुधापासून बनविलेले हे गोळे ब्रिटिश अधिकाऱ्यांना खायला दिले जायचे. ब्रिटिश अधिकाऱ्यांना ‘करंडी’ हा शब्द उच्चारता येत नसल्याने ते ‘कॅन्डी’, ‘कंडी’, ‘कन्दी’ असा शब्दोच्चार करत असत. पुढे या शब्दाचा अपभ्रंष होऊन हा शब्द ‘कंदी’ म्हणून नावारूपास आला. आणि साताऱ्याचा पेढा ‘कंदी पेढा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.खव्यापासून विविध पदार्थ बनविले जातात. काजू मोदक, खवा मोदक, मलई पेढा, बर्फी, दुधी हलवा, गाजर हलवा, गुलाबजाम असे विविध पदार्थ खव्यापासून तयार करतात. काही घरांमध्ये अर्धा लीटर दुधात पावशेर खवा टाकून त्याची घरगुती स्वरूपातील बासुंदी केली जाते. याला दूध खवा असेही म्हटले जाते. चारोळ्या, बदाम, काजू आणि पिस्ता या सर्वांचे बारीक तुकडे करून साखर घालून हा दूधखवा उत्कृष्ट लागतो. श्रावण महिन्यात घरी येणाऱ्या पाहुण्याला ही डीश दिली जाते. चहाला उत्तम पर्याय म्हणूनही या डीशकडे पाहिले जाते. काही गृहिणी स्वत: घरी खवा बनवितात.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळ सारख्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी पथक तयार केले आहे. येत्या काही दिवसांत या अनुषंगाने तपासणी करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात तयार होणारा खवा हा उच्चप्रतीचा आहे. बहुतेक मिठाई विक्रेते हे स्वत: खवा तयार करण्यावर भर देतात. खव्याची बाहेरून होणारी आवक कमी आहे. असे असले तरी अन्न व औषध प्रशासन विभाग अन्य जिल्ह्यांतून आयात होणारा खवा तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थांनी तपासणी करणार आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त आर. एस. बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सातारी पेढ्याला कृष्णाकाठचा खवा..!
By admin | Updated: August 22, 2014 00:55 IST