सातारा : कोरोनाचा विषाणू धातूच्या पृष्ठभागावर सर्वाधिक काळ जिवंत राहतो, अशी पोस्ट काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांतून फिरत होती. आरोग्य विभागातील तज्ज्ञही त्याला दुजोरा देत होते. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या एस. टी.वर वाईट परिणाम झाला. खरे दैवत असलेले प्रवासीच आजारी पडू नयेत, म्हणून महामंडळाने सणासुदीच्या तोंडावर एस. टी.ला ‘ॲन्टी व्हायरस’चा डोस दिला आहे.
‘एस. टी.ला ॲन्टी व्हायरसचा डोस’ होय खरं वाचताय. कोणत्याही विषाणूची लागण झाल्यामुळे माणसं आजारी पडतात. अशावेळी डॉक्टर रुग्णांना ॲन्टी व्हायरसचा डोस देऊन बरं करतात. त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी तोट्यात चालणारी एस. टी. गेल्या आठ-दहा वर्षांत पुन्हा सुरळीत सुरू होती. दररोज कोट्यवधींचे उत्पन्न शासनाच्या तिजोरीत जमा होत होते. अशातच गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाबाबत शास्त्रीय माहिती कोणालाच फारशी नव्हती. कोरोनाचा विषाणू कोणत्या पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहू शकतो, हे पसरू लागले. एस. टी.त कमी जागेत पन्नास लोकांनी प्रवास करणे म्हणजे प्रत्येकाचा खिडक्या, दरवाजे, बाकडे, हॅण्डलला स्पर्श होणं साहजिकच होतं. त्यामुळे एस. टी.सारखी सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारी सेवा बंद करावी लागली. कोरोनाची लागण माणसांना झाली खरी पण एस. टी. आजारी पडली. तिचे उत्पन्न पूर्णपणे थांबले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे तीन-तीन महिने पगार थांबले, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
एस. टी.ला यातून बाहेर काढण्यासाठी महामंडळाने ॲन्टी मायक्रोबिअल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश गाड्यांचे कोटिंग करुन झाले आहे.
काय आहे ॲन्टी मायक्रोबिअल कोटिंग
ॲन्टी मायक्रोबिअल हे विशिष्ट रसायन असते. प्रवाशांचा सातत्याने स्पर्श होत असलेल्या पृष्ठभागावर हे रसायन यंत्राच्या साह्याने आतून-बाहेरुन लावले जाते. एका गाडीला रसायन फवारणी करुन झाल्यानंतर रसायन स्थिरस्थावर होण्यासाठी पंधरा मिनिटे लागतात. त्यानंतर विशिष्ट कोटिंग तयार होते. त्यामुळे पुढील काही महिने तरी या पृष्ठभागावर कोणताच विषाणू जिवंत राहू शकत नाही. साहजिकच प्रवासात एखाद्यापासून कोरोनाचा विषाणू हॅण्डलवर पोहोचला तरी तो मरेल अन् इतरांना संसर्ग होणार नाही.
कोट
सणासाठी सातारकर गावी जातात. अशात एखाद्या बाधित व्यक्तीपासून इतरांना लागण होऊ नये, म्हणून एस. टी. महामंडळाने सातारा विभागातील सर्व गाड्यांना ॲन्टी मायक्रोबिअल रसायनाचे कोटिंग केले आहे. त्यामुळे कोणताच विषाणू एस. टी.च्या पृष्ठभागावर जिवंत राहणार नाही.
- सागर पळसुले,
विभाग नियंत्रक, सातारा.
फोटो
०५एसटी-कोटिंग
सातारा आगारातील एस. टी.च्या पृष्ठभागावर ॲन्टी मायक्रोबिअल कोटिंग केले आहे.