कुडाळ : भारत कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसायही अर्थार्जनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जात होता. स्वयंपाकासाठी लाकूडफाट्याला बाजूला सारून घरात शेणाचा उपयोग करून बायोगॅस संयंत्र आले. आज मात्र वाढत्या गॅस दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या ग्रामीण जनतेला या गोबरगॅसची आवर्जून आठवण होऊ लागली आहे.
गायीगुरांच्या शेणापासून बायोगॅसच्या निर्मितीने गृहिणींच्या डोळ्यातले अश्रू पुसले. सबसिडीत मिळालेल्या गोबर गॅसचा ग्रामीण भागात घरोघरी वापर हाेऊ लागला. मात्र, बदलत्या कालानुरूप याची जागा एलपीजी सिलिंडर गॅसने घेतली. सुरुवातीला भीतीदायक वाटणारा हा गॅस प्रत्येकाच्या घरचा अविभाज्य घटक कधी झाला, हे कळलंच नाही. शासनानेही याच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेतून सबसिडीही दिली. आता मात्र सबसिडीही बंद झाली आहे. अशातच वाढत्या गॅस दरवाढीने सामान्यांना गॅस विकत घेणेही आर्थिकदृष्टीने जिकरीचे बनले आहे.
महागाईने त्रासलेल्या जनतेचा जीव अगदी मेटाकुटीला आला आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात चुलीचा वापर होऊ लागला. यावेळी मात्र विनाखर्चाच्या बायोगॅसची आठवण ताजी होऊ लागली आहे. बदलत्या कालानुरूप शेती व्यवसायही बदलत गेला. आधुनिकतेच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करत शेती होऊ लागली. यामुळे पशुधनाचाही वापर कमी झाला. ज्या गाई, बैल, म्हैशींच्या शेणाचा उपयोग होत बायोगॅस संयंत्र चालायचे, तेही काळाच्या ओघात बदलले. पूर्वीच्या काळात गोबरगॅस घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाई. आज मात्र घराघरात एलपीजी गॅस पोहोचल्याने गोबरगॅस काळाच्या ओघात बाजूला सरला आहे.