ओगलेवाडी : विद्यानगर येथील जलभरावाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. येथील राधागोविंदनगर ते सप्तपदी मंगल कार्यालय या दरम्यान असणारी अतिक्रमणे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने काढली. त्यामुळे याठिकाणी भुयारी गटार बांधून पाण्याचा निचरा करणे शक्य होणार आहे. जलभराव समस्येवर कायमचा उतारा मिळणार आहे.
कऱ्हाड - विटा रस्त्यावर विद्यानगर परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. यावर्षीही गजानन हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव यांनी परिसरातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. यावर्षी पहिल्याच पावसात येथे पाणी साठले आणि प्रशासन कामाला लागले. सुरूवातीला राधागोविंदनगर ते सप्तपदी मंगल कार्यालय या रस्त्याची मोजणी करून त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली.
सोळा फूट रूंद असलेल्या या रस्त्यावर स्वच्छतागृहे, झाडेझुडपे व तार कंपाऊंड अशी अतिक्रमणे होती. ती काढल्यामुळे सोळा फुटाचा रस्ता मोकळा झाला. रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित करण्यात आली आहे. ही सर्व कार्यवाही कऱ्हाडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी लक्ष घालून पार पाडली. स्वत: पाण्यात उतरून ते कार्यवाहीबाबत सूचना देत होते.
यावेळी मंडल अधिकारी विनायक पाटील, तलाठी साळुंखे, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव, ग्रामसेवक निंबाळकर, सदस्य सुरेश हजारे, प्रा. रामभाऊ कणसे व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
आरोग्याकडेही लक्ष
सध्या चारी काढून पाण्याला वाट करून दिली आहे. मात्र, पावसाळा संपल्यावर याठिकाणी प्रशस्त भुयारी गटार बांधून त्यातून या पाण्याचा निचरा होणार आहे. भुयारी गटार निर्माण केल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्याही निर्माण होणार नाहीत. पाणी काढून देताना आरोग्याकडेही लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी दिली.
फोटो आहे...
विद्यानगरमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यातील अतिक्रमणे काढण्यात आली. (छाया : संदीप कोरडे)