इस्लामपूर : कृष्णाची निवडणूक साम, दाम, दंड व भेद नीतीचा अवलंब करून सर्व ताकदीनिशी लढविली जाणार आहे. रयत पॅनेलला जिथे अडचण येईल तिथे विश्वजित कदम कुठेही कमी पडणार नाहीत. ही निवडणूक मी माझ्या रणनीतीने लढविणार असल्याचे स्पष्ट मत सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर (ता. वाळवा) येथे वाळवा तालुका काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीद्वारे कदम यांनी रयत पॅनेलच्या प्रचारात सक्रिय होत रणशिंग फुंकले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील होते. या वेळी युवा नेते जितेश कदम व वाळवा तालुक्यातील यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
कदम म्हणाले, यशवंतराव मोहिते यांच्या मोठ्या श्रमातून कृष्णा कारखान्याची उभारणी झाली. कारखान्यामुळे या विभागात नंदनवन फुलले. भाऊंचे आशीर्वाद घेऊन अनेक जण मोठे झाले; पण त्यांच्या विचारांना केवळ पतंगराव कदम यांनीच जिवंत ठेवले. इंद्रजित मोहिते कुटुंबातील सदस्य आहेत. कदम कुटुंब सर्व ताकदीनिशी रयतच्या पाठीशी आहे. उमेदवारांनी मनात कोणताही किंतु न ठेवता ही निवडणूक लढवावी.
बाळासाहेब पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रयत पॅनेलच्या पाठीशी ठाम उभे आहेत. तालुक्यातील सर्वसामान्य सभासद हा इंद्रजित मोहिते यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील.
प्रा. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे, राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा छायाताई पाटील, दिलीपराव मोरे-पाटील, पै. गुलाबराव ऊर्फ जयकर पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.
फोटो -१५०६२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर कदम न्यूज
इस्लामपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत विश्वजित कदम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जितेश कदम, धनाजी बिरमुळे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.