फलटण(प्रतिनिधी) : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत व सध्या पोलीस स्टेशन हद्दीत चोरी, घरफोडीसारखे गुन्हे होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जवळ तसेच घरामध्ये जास्त मौल्यवान वस्तू, दागदागिने, रोख रक्कम ठेवू नये, ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी. अगर आपल्या घरामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवावी जेणेकरून, आपल्या घरामध्ये चोरी झालीच तर, ती चोरट्यांचे हाताला लागू नये. जर आपण आपले घर बंद करून बाहेरगावी मुक्कामासाठी जाणार असेल तर तसे आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांना, तसेच शेजारील पोलीस स्टेशनला कळवावे. म्हणजे, रात्रगस्त दरम्यान आपल्या बंद घराकडून पोलिसांना पेट्रोलिंग करता येईल असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले आहे.
तसेच गावचे पोलीस पाटील यांनी आपापले गावातील ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करून, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य यांच्या संख्येप्रमाणे रात्रगस्तीचे नियोजन करून, आपापल्या गावात रात्रगस्त सुरू करावी. जर गावात कोणी अनोळखी व्यक्ती अगर कोणी नवीन फिरस्ता व्यक्ती दिसला, तर तो कोण आहे? कुठून आला आहे? याबाबत चौकशी करावी व त्याचा फोटो काढून ठेवावा, तसेच जर त्याच्यावर संशय असेल तर तसे पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले आहे.