घरोघरी स्वच्छता अभियान राबवून ग्राम स्वच्छतेचा मूलमंत्र त्यांनी रुजवला. १८९८मध्ये श्रीयमाई श्रीनिवास विद्यालयाची स्थापना केली होती. या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, सानेगुरुजी, बॅरिस्टर आप्पासाहेब पंत, उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, सिने दिग्दर्शक मधुकर पाठक, ग. दि. माडगूळकर, पंडित सातवळेकर अशा अनेक महान विभूतींनी याठिकाणी शिक्षण घेतले.
औंध पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची मोठी गैरसोय होती. ही होणारी गैरसोय दूर करण्यासाठी श्रीपतराव ऊर्फ राजेसाहेब पंतप्रतिनिधी यांनी प्रयत्न करून याठिकाणी ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा सुरू केली. त्यांच्या पश्चात दिवंगत बाळराजे पंतप्रतिनिधी यांनीही शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले. त्यांच्यानंतर औंधच्या शैक्षणिक विश्वाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य औंध संस्थानच्या अधिपती माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, औंध शिक्षण मंडळाच्या चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केले. या कामामध्ये उपमुख्यमंत्री, औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोलाचे योगदान देऊन सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्राची जाण असलेल्या या नेत्याने विद्यार्थ्यांना चांगल्या भौतिक सुविधा, सुसज्ज इमारती, युवकांसाठी अत्याधुनिक जीमखाना तसेच श्रीभवानी जीमखाना, श्रीभवानी बाल विद्यामंदिर सुरू करून दर्जेदार प्राथमिक शिक्षण तसेच श्रीमंत हर्बिताराजे इंग्लिश मीडियम हायस्कूल सुरू करून इंग्रजी शिक्षणाची कवाडे खुली केली आहेत.
शब्दांकन : प्रा. प्रदीप कणसे,
- प्रा. संजय निकम