सातारा : ‘होय, सांगलीकरांची तहान भागविण्यासाठी एक नाही, दोन नाही, शंभर योजना राबवा... परंतु माण-खटाव तालुक्यातील सुमारे १२० गावे आजही घोटभर पाण्यासाठी तडफडत असताना आमच्या तोंडचं पाणी पळविण्याचा घाट घालणारे हे सांगलीतील नेते कोण?,’ असा संतप्त सवाल दुष्काळग्रस्तांनी केलाय. ‘आधी आम्हाला पाणी द्या, मग उरले तर तुम्ही घ्या!,’ असेही या भागातील सर्वसामान्य दुष्काळग्रस्तांनी ठणकावून सांगितलंय.सांगली जिल्ह्यातील गावांची तहान भागविण्यासाठी साताऱ्याच्या पाण्यावर आमचाही हक्क आहे, असं वनमंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. सांगली हा साताऱ्याचा मूळचाच भाग आहे, अशीही आठवण त्यांनी करून दिली. तालुक्यातील या वक्तव्यानंतर माण-खटाव तालुक्यातील तहानलेल्या गावांमध्ये एकच चुळबूळ सुरू झाली. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, तरीही आम्हाला आज घोटभर पाण्यासाठी रोज तडफडावं लागतं. गेली कित्येक दशकं आम्ही आमच्या हक्क्याच्या कालव्यांची वाट पाहतोय. अशा परिस्थितीत आमच्या घशाची कोरड कायम ठेवून साताऱ्याचे पाणी सांगलीला पळविण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल विचारला गेला.पाणी पळविणाऱ्यांविरुद्ध उठाव करा : उदयनराजेराजकीय दबावाचा वापर करून सांगलीतील नेत्यांनी उरमोडीचे पाणी सांगलीला पळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. दुष्काळी भागावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जनतेने जोरदार उठाव करावा, त्याचे नेतृत्व करेन. दुष्काळी भागातील पूर्ण लाभक्षेत्राला पाणी मिळाल्याशिवाय सांगलीला पाण्याचा एक थेंबही देणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिला आहे.उरमोडी पाटबंधारे प्रकल्पाच्या वीस वर्षांपूर्वीच्या मूळ आराखड्यात माण, खटाव तसेच सातारा तालुक्यातील दुष्काळी ११० गावांचा समावेश असून २७ हजार ७५० हेक्टर सिंचन क्षेत्राचा समावेश आहे. या गावांना मंजूर प्रकल्पानुसार ९.५९३ टीएमसी पाणी देणे अपेक्षित आहे. सांगलीतील नेत्यांनी चार गावे या प्रकल्पात घुसवडली आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावांना आखलेल्या योजनांना निधीची ओरड असताना याच योजनांचे बेकायदा पाणी पळविणाऱ्या योजना आखून येथील दुष्काळी जनतेवर अन्याय केला जात आहे.सांगलीला पाणी नेणाऱ्या योजनेला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. मात्र, मंत्र्याच्या दबावामुळे खटाव तालुक्यातील चोराडे येथे कालव्यांच्या कामाला सुरुवातही झाली आहे. या अन्यायाविरोधात लढा उभारण्याची गरज निर्माण झाली असून पाणी पळविणाऱ्यांविरोधात जोरदार उठाव झाला पाहिजे, असे खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.तर माण-खटावचा दुष्काळी कलंक पुसेलमायणी/पुसेसावळी/दहिवडी : उरमोडीचे पाणी पूर्ण क्षमतेने माण-खटाव तालुक्याला मिळाले तर या तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. या दोन्ही तालुक्यातील सुमारे १२० गावांची तहान या पाण्यामुळे भागणार आहे. खटाव तालुक्याच्या पूर्व-पश्चिम भागातील सुमारे ७० गावांना तर माण तालुक्यातील सुमारे ५० गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. यामुळे पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. तसेच या भागातील गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. धरण सातारा जिल्ह्यात अन् त्याचे पाणी मात्र सांगली जिल्ह्याला, हा अन्याय कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका आता माण-खटाव तालुक्यातील जनतेने घेतली आहे.
आधी आमची तहान भागवा!
By admin | Updated: August 18, 2014 23:28 IST