सचिन काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नगरपालिका व नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी व अ वर्ग दर्जा असलेल्या सातारा पालिकेचा गड काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांचे देखील आतापासूनच ‘खेळ’ सुरू झाले आहेत. परंतु, यंदाची निवडणूक सोपी मुळीच नसणार आहे. पावणे पाच वर्षांच्या कालावधीत बदललेल्या राजकीय समीकरणांचा प्रभाव या निवडणुकीवर निश्चितच पडणार आहे.
सातारा पालिकेच्या २०१६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीने जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष वेधून घेतले. कारण या निवडणुकीचा सामना दोन आघाड्यांमध्येच नव्हे तर दोन राजेंमध्ये रंगला. दोन्ही राजेंचे मनोमिलन तुटल्याने शिलेदारांनी स्वतंत्र आघाड्या करून निवडणूक लढली. या निवडणुकीत खासदारांच्या आघाडीने नगराध्यक्षपदासह २२ जागा जिंकत नगरपालिकेचा गड काबीज केला. तर आमदारांच्या आघाडीला १२ व भाजपच्या सहा नगरसेवकांना निवडणुकीत विजय मिळविता आला. सत्ता स्थापनेपासून सत्ताधाऱ्यांनी सातारकरांना हितकारी असणाऱ्या योजना मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला. त्यापैकी कास धरणाची उंची व कण्हेर पाणी योजनेचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा ठरला. परंतु, विकासकामे न करणे, निधी न देणे, कामात भ्रष्टाचार करणे असे अनेक आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने होत राहिले.
गेल्या पावणे पाच वर्षांच्या कालावधीत पालिकेच्या सारीपाटावर बऱ्याच घडामोडी घडल्या. शहराची हद्दवाढ झाली. शाहूपुरी, दरे, खेड, विलासपूर, गोडोली कोडोली हा भाग पालिकेत समाविष्ट झाला. त्यामुळे यंदा वाॅर्ड रचनेत मोठा बदल होणार आहे. वाॅर्ड रचना कशी होते, कोणता भाग कोणत्या भागाला जोडला जातोय यावर बरीच उलथापालथ होणार आहे. दरम्यान, बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द झाल्याने यंदा ४८ वाॅर्ड पडणार असून नगरसेवक संख्या ही ४८ इतकी निश्चित होणार आहे. सध्यातरी विद्यमान नगरसेवकांनी पायाला भिंगरी बांधली असून अपूर्ण कामे मार्गी लावण्याची त्यांची कसरत सुरू झाली आहे. आपल्या वाॅर्डात आपली उमेदवारी कशी सक्षम राहील यासाठी जो तो प्रयत्न करू लागला आहे.
(जोड)