वडूज : ‘दुनियाला सांगे तत्त्वज्ञान स्वतःच मात्र अज्ञान’ याची प्रचिती वडूज नगरपंचायतीमध्ये सध्या येत आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे स्क्वेअर जागेत आठ विभागांतील २५ कर्मचारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांसह १७ नगरसेवक यांचा दैनंदिन राबता असतो. त्यातच दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. दोनच दिवसांपूर्वी चंद्रपूरहून बदली होऊन आलेले कर्मचारी यांचीही भरीस भर पडली आहे. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना आणि दाटीवाटीने कामकाज करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांची मानसिक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे आता सांगा साहेब, आम्ही नेमकं बसायचं कुठं, अशी आर्त हाक ऐकावयास मिळत आहे.
नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायत इमारतीमध्ये गत साडेचार वर्षांपासून नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी प्रशस्त इमारतीचा पर्याय उपलब्ध असून, देखील मूग गिळून दाटीवाटीने कामकाज करीत आहेत. नगरपंचायतमध्ये आठ स्वतंत्र विभाग असणे आवश्यक असतानादेखील इमारतीतील अपुऱ्या जागेत दाटीवाटीने कामकाज सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजना कक्षाच्या अधिकारी उपनगराध्यक्षांच्या दालनात बसून कारभार चालवत आहेत. मुख्याधिकारी सोडले तर कोणालाही स्वतंत्र मुतारीची सोय नाही. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानादेखील आणि पर्यायी इमारत असताना सुद्धा संबंधित याच इमारतीत ठाण मांडून कार्यरत आहेत, तर जीव मुठीत घेऊन कारभार सांभाळणाऱ्यांना काळजी घेऊन ही विनाकारण बाधित व्हावे लागले, याला नेमके जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होतो. नगरपंचायतमध्ये वडूज शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यातच कर्मचाऱ्यांना एकमेकांना खेटून खुर्ची-टेबल मांडलेल्या ठिकाणी कार्यरत राहावे लागत आहे.
नगरपंचायत परिसरात ना पार्किंग, ना कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, महिला व पुरुषांसाठी ना शौचालय अशी चौफेर ओरड असताना नगरपंचायत इमारत स्थलांतराला संबंधितांकडून खो घातला जात आहे. प्रशस्त जुनी तहसील इमारत वाट पाहत असताना दाटीवाटीने सुरू असलेले कामकाज आणि कोरोना संसर्गाची पुसटशीही भीती नसलेले नगरपंचायत मुख्याधिकारी व नगरसेवक यांना नेमके काय साध्य करायचे आहे, हेच येथील कर्मचारी व सुज्ञ नागरिकांना समजेनासे झाले आहे. बहुचर्चित या इमारतीबाबत च्या विषयावर ‘हा सूर्य आणि जयद्रथ’ असे पारदर्शक वास्तव समोर असूनदेखील होणारा कानाडोळा येथील नागरिकांना आक्रमक होण्यासाठी एकप्रकारे आव्हानच देत आहे.
चौकट...
नवे कर्मचारी म्हणे, साहेब खुर्ची कुठे टाकू?
फिजिकल डिस्टन्सिंगची ऐशी की तैशी चक्क नगरपंचायत कार्यालयातच पाहावयास मिळत आहे. कर्मचाऱ्याला बाहेर पडावयाचे असेल तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची खुर्ची उचलून बाजूला ठेवल्याशिवाय बाहेर पडाताच येत नाही. हा जाच कधीतरी संपेल या एकाच आशेवर येथील कर्मचारी मान खाली घालून कार्यरत आहेत. वास्तविक पाहता सध्याच्या नगरपंचायत इमारतीला पर्यायी भव्य इमारत मिळत असताना देखील विनाकारण संबंधितांचा हेकेखोरपणा लक्षात येताच काही कर्मचारी बदलीसाठी आग्रही असल्याचे वास्तव समोर आले आहे, तर नव्याने हजर झालेले कर्मचारी साहेब, आम्ही खुर्ची-टेबल कोठे टाकू, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
फोटो: 1) सद्यस्थितीतील नगरपंचायत इमारत-
२) जुनी तहसील इमारत ( शेखर जाधव )