सातारा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या उच्छांदाच्या अनेक भयभीत करणाऱ्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या कुत्र्यांना फारसे कोणी दया दाखवत नाही. दूरवरून येणारे कुत्रे दिसले तरी अनेकजण आपला रस्ता बदलतात. इतकी दशहत या भटक्या कुत्र्यांची जनमानसात आहे. गत दोन वर्षांपूर्वी कोडोली येथे एका भटक्या कुत्र्याने सात वर्षाच्या मुलाचे अक्षरश: लचके तोडले होते. यातच त्या मुलाचा जीव गेला. त्यामुळे सातारकरांच्या मनात या भटक्या कुत्र्यांविषयी चीड निर्माण झाली. ही घटना सातारकरांच्या विस्मृतीतून जात असतानाच गत पाच महिन्यांपूर्वी सातारा शहराजवळ असलेल्या जकातवाडी येथे भटक्या कुत्र्याने एक युवती आणि युवकावर हल्ला केला. यात जखमी झालेल्या दोघा युवक युवतीचा महिनाभराच्या उपचारानंतर मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्युनंतरचा मानसिक धक्का सातारकरांच्या मनात खोलवर रुजलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली सातारकर आजही वावरत आहेत.
या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकदा नागरिकांकडून केली जाते. मात्र, पुढे त्याचे काहीच होत नाही. अशाप्रकारे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा उफाळून येतो. तसं पाहिलं तर या भटक्या कुत्र्यांना वेळेवर अन्न मिळत नाही. त्यामुळे कुत्रे अन्नाच्या शोधात अन्यत्र भटकत असतात. विशेषत: कचरा डेपोमध्ये ही कुत्री पाहायला मिळतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे शिळे अन्न टाकले जाते. हे अन्न काहीवेळेस कुजून त्याचे विषही तयार होते. अशावेळी मग या भटक्या कुत्र्यांनी हे कुजलेले पदार्थ खाल्ल्यास त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. परिणामी सैरभर होऊन माणसांचा चावा घेतात, असे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.
चौकट :
पावसाळ्यात होतात पोटाचे हाल
घरातील शिल्लक राहिलेलं अन्न हे भटक्या कुत्र्यांचे महत्त्वपूर्ण खाद्य असते. घराबाहेर अन्न टाकलं की त्यावर तुटून पडणाऱ्या कुत्र्यांना पावसाळ्यात मात्र उपाशी राहण्याची वेळ येते. घराबाहेर काही टाकलं तरी पावसात ते भिजल्याने श्वानांना ते खाता येत नाही. पोटात पडलेल्या भुकेच्या आगीने हे श्वान आक्रमक होते आणि माणसांवरही हल्ला करते. या दिवसांत मिळेल ते अन्न खाल्ल्यामुळे श्वानांना डायरियाचा त्रासही होतो. पण भटक्या कुत्र्यांवर त्याचे उपचारच होत नाहीत.
- दत्ता यादव