पाटण : ‘जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्र्यांनी ‘चॅलेजिंंग जॉब’ म्हणून स्वीकारलेली योजना आहे. जिल्ह्यासाठी पालकमंत्री व माझ्या प्रयत्नातून ३५ कोटींचा निधी मंजुर झाला आहे. तालुक्यातील २० गावांमध्ये ही योजना राबविताना अधिकाऱ्यांनी कामाचा दर्जा राखला पाहिजे. दर्जेदार कामे व्हावी यासाठी लोकसहभाग असावा. जलयुक्तसाठी सुचविलेल्या कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करावी. कृषी विभागाने यापूर्वी राबविलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमाची जलयुक्त शिवारमध्ये पूनरावृत्ती नको,’ अशी अपेक्षा आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. पाटण तहसील कार्यालयात शनिवारी आयोजित जलयुक्त शिवार योजना कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी संजीव जाधव, तहसीलदार, रवींद्र सबनीस, उपसभापती डी. आर. पाटील, गटविकास अधिकारी अरविंद पाटील, नायब तहसीलदार राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते. आमदार देसाई म्हणाले, ‘जलयुक्त अभियानातील कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाली पाहिजे. तालुक्यात बांधण्यात आलेल्या लघूपाटबंधारे, नालाबांध, तलाव यांची सद्य:परिस्थीती काय आहे. बांधण्यात आलेल्या तलावांमध्ये पाणीसाठा होतो का? त्याचा लोकांना उपयोग झाला आहे का? याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे चालू असलेल्या कामांवर लक्ष पाहिजे. जलयुक्त शिवार योजनेतील सुरू कामाच्या ठिकाणी मी सरप्राईज भेट देणार आहे. कामे फक्त कागदावर नको.’ तहसीलदार रविंन्द्र सबनिस म्हणाले, ‘जलयुक्त शिवारमध्ये लोकसहभागातून कामे करावयाची आहेत. यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, सारखी यंत्रे पुरवण्यात आली तर त्यास लागणारे डिझेल शासनामार्फत पुरविले जाईल. वेखंडवाडी येथे अशीच कामे झाली असून गाळ उपसा करू तेथील ग्रामस्थांनी गाळाच्या मातींवर सूपीक शेती केली आहे.’ आदर्श आमदार योजनेसाठी तालुक्यातील सोनवडे व वेखंडवाडी या गावांची निवड करण्यात आली आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला तसेच ग्रामिण पाणीपुरवठा उपअभियंता आर. व्ही. पाटील, लघु पाटबंधारे विभागाचे श्री. भंगे यांनी आपल्या कामाचा आढावा दिला. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘जलयुक्त’मध्ये पाणलोटचा कित्ता नको
By admin | Updated: June 7, 2015 00:28 IST