नितीन काळेल
कला माणसाला मोठी करते. अशाचप्रकारे साताऱ्यातील श्वेता हसबनीस-जंगम यांनी कोरोनातील लॉकडाऊनदरम्यान वेळ जावा म्हणून घरी जमविलेल्या विविध प्रकारच्या दगडांवर पेंटिंग (स्टोन पेंटिंग) केले. त्यावर निसर्गाची छायाचित्रे रेखाटली. आता हेच स्टोन पेंटिंग त्या संक्रांतीला वाण म्हणून देणार आहेत. लोकांनी निसर्गाच्या जवळ जावे म्हणूनच श्वेता या पेंटिंगचे वाण महिलांना देणार आहेत.
कला माणसाला अमर करते. कला असणारा माणूस कधीच एकटा नसतो. म्हणूनच, माणसाकडे एखादीतरी कला असावी असे म्हणतात. अशाचप्रकारे एक म्हणजे साताऱ्यातील संगमनगर येथे राहणाऱ्या श्वेता हसबनीस-जंगम. श्वेता या डॉईंगच्या क्लासेस घेतात. त्यांचे वडीलही चित्रकलेचे प्राध्यापक होते. त्यामुळे घरातूनच श्वेता यांना कलेचे महत्त्व समजले. तर सासरी पती अनिश जंगम हे अॅडव्हरटाईजींग एजन्सी पाहतात. त्यामुळे माहेर आणि सासरीही कलायुक्त जीवन. कलेची आवड असणाऱ्या श्वेता या बाहेर कोठेही गेल्या की वेगवेगळ्या प्रकारचे दगड जमा करून घरी आणत. साताऱ्याजवळील संगम माहुली, म्हसवे या परिसरात असणाऱ्या नदीपात्रातून अनेक दगड-गोटे त्यांनी जमा केले होते.
कोरोनाच्या काळात सुरुवातीला लॉकडाऊन जाहीर झाला होता. त्यामुळे ड्रॉईंगचे क्लासेस बंद ठेवावे लागले. लॉकडाऊन असल्याने बाहेर पडताही येत नव्हते. अशावेळी श्वेता यांच्या कलेला आणखी बळ मिळाले. त्यातच मुलालाही बाहेर जाऊन खेळता येत नव्हते. परिणामी वेळ घालविण्यासाठी श्वेता यांनी जमा केलेल्या दगड-गोट्यांवर चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. साडेचार वर्षांच्या असणाऱ्या रिशानच्या हातातही प्रथमच कलर आणि ब्रश आला. तर श्वेताच्या आई स्नेहा हसबनीस याही या कलेत रमून गेल्या. त्यामुळे तिघांनीही जमा केलेल्या दगड-गोट्यांवर चित्रे रेखाटली. त्याचबरोबर पाना-फुलांच्या चित्रांनाचाही सुबकपणे वापर केला. यासाठी अॅकॅ्रलिक कलर वापरला. यामुळे पाणी पडले तरी पेंटिंग पुसून जात नाही. हा रंग बराचकाळ टिकून राहतो.
आता मकर संक्रांतीला श्वेता या स्टोन पेंटिंगच वाण म्हणून महिलांना देणार आहेत. हे पेंटिंग पेपर वेट, शोपिस म्हणून घरात राहीलच. त्याशिवाय घरासमोरील झाडांच्या कुंडीत पेंटिंग केलेले दगड सुंदरतेत भर घालणार आहेत. तसेच त्यावर पाने, फुले, झाडांचे नक्षीकाम रेखाटल्याने निसर्गाची अनुभूती मिळून पर्यायाने लोकही निसर्गाकडे ओढले जाणार आहेत. अशीच या स्टोन पेंटिंगमागची कल्पना आहे.
कोट :
मकर संक्रांतीला प्लास्टिकच्या वस्तूंचे वाण देऊन आपण पर्यावरणाची हानी करतो. हे टाळण्यासाठी संक्रांतीला स्टोन पेंटिंग देण्याचा निश्चय केला आहे. कारण, कोरोना लॉकडाऊन काळात विविध आकाराच्या स्टोनवर पेंटिंग केले आहे. हे पेंटिग निसर्गाच्या जवळ जाणारे आहे. पेपरवेट, शोपिस म्हणूनच याचा वापर होईल. तसेच बागेचीही शोभा वाढणार आहे. यामुळे नागरिक आणखी निसर्गाच्या जवळ जातील.
- श्वेता हसबनीस-जंगम
..........................................................