लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : पाटण तालुक्यात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे निसर्गाचे संकट येऊन गेले. ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार झाला. यात पाटण तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकाचा नायनाट झाला. लोक दगावले, घरे पडली; त्यानंतर राज्यातील अनेक मंत्र्यांनी पाटणकडे धाव घेतली. नुकसानीचे पंचनामेही झाले; परंतु अद्याप तरी शासन बाधित शेतकऱ्यांना आणि बेघर झालेल्या निराधारांना आर्थिक मदत देण्यासाठी राजी नसल्याचे दिसत आहे.
पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटी भूस्खलन यामुळे ३७ जणांनी आपला जीव गमावला. तालुक्यातील ११०० घरांची पडझड झाली, तसेच २४० पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. त्याही पुढे जाऊन नुकसानीचा आकडा पाहता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाटण तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांचे ३९९ हेक्टरवरील शेती पिके जमीनदोस्त झाली.
तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी ढोकावळे मिरगाव या गावांमधील काही वस्त्या भूस्खलन झाल्यामुळे जमिनीत गाडल्या गेल्या. संपूर्ण राज्यभर या घटनांची मोठी चर्चा झाली. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यासहित अनेक मंत्री, आमदार, खासदार यांनी पाटण तालुक्याचा दौरा केला. नुकसानीची पाहणी केली एवढेच काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाटण तालुक्यातील आपत्तीची हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणी केली.
एवढं सगळं होऊनही दीड महिना झाला तरी तालुक्यातील बाधित शेतकरी आणि ज्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शासन अशा लोकांना कधी मदत देणार, याकडे डोळे लावून बसला आहे.
कोट...
पाटण तालुक्यातील जवळपास तीस हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामेदेखील झाले. शासनाकडून मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली तर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर त्यांची आर्थिक मदत जमा होईल.
-सुनील ताकटे,
तालुका कृषी अधिकारी,पाटण